‘नुरा’ कुस्तीने काळवंडला इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2016 02:58 AM2016-07-26T02:58:22+5:302016-07-26T02:58:22+5:30

रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदक मिळेल की नाही माहीत नाही; परंतु भारतीय कुस्ती क्षेत्रात नरसिंग यादव आणि सुशीलकुमार यांच्यामध्ये जो कुस्तीचा डाव रंगला आ

'Nura' Wrestling History of Kalvand | ‘नुरा’ कुस्तीने काळवंडला इतिहास

‘नुरा’ कुस्तीने काळवंडला इतिहास

googlenewsNext

- विश्वास चरणकर, कोल्हापूर

रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदक मिळेल की नाही माहीत नाही; परंतु भारतीय कुस्ती क्षेत्रात नरसिंग यादव आणि सुशीलकुमार यांच्यामध्ये जो कुस्तीचा डाव रंगला आहे, त्याने मात्र देशवासीयांची मान शरमेने खाली जात आहे. आॅलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणाऱ्या या खेळात रंगलेलं राजकारण पाहता शौकिनांच्या अपेक्षांना तडे जात आहेत.
७0८ सालचे प्राचीन आॅलिम्पिक आणि १८९६ च्या पहिल्या आधुनिक आॅलिम्पिकमध्ये कुस्तीचा समावेश होता. पण, १९00 साली झालेल्या आॅलिम्पिकमध्ये कुस्तीला डच्चू मिळाला. १९0४ पासून कुस्ती पुन्हा आॅलिम्पिकचा भाग बनली. त्यानंतर शंभर वर्षांनी म्हणजे २00४ च्या आॅलिम्पिकमध्ये महिला कुस्तीचा समावेश झाला. फेब्रुवारी २0१३ मध्ये कुस्तीला २0२0 च्या आॅलिम्पिकमधून वगळण्याचा घाट घालण्यात आला; पण कुस्ती खेळणाऱ्या देशातून वाढलेला दबाव पाहून शेवटी आयओसीने डिसेंबर २0१३मध्ये हा निर्णय रद्द केला.
भारतीय आॅलिम्पिकच्या इतिहासात कुस्तीसाठी मानाचे पान राखून ठेवले आहे, त्याला कारण म्हणजे देशाला पहिले वैयक्तिक पदक कुस्तीने मिळवून दिले. भारताने यापूर्वी आॅलिम्पिकमध्ये जी पदके जिंकली होती, ती हॉकीमध्ये सांघिक कामगिरीमुळे जिंकली होती. १९५२ साली हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांना कांस्यपदक मिळाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खाशाब यांनी हे यश मिळविले होते. यानंतर तब्बल ५६ वर्षे कुस्तीमध्ये पदकासाठी झुंजावे लागले. २00८च्या बीजिंग आॅलिम्पिकमध्ये सुशीलकुमार याने कांस्यपदक जिंकून हा दुष्काळ संपविला. ६६ किलो वजन गटात फ्रीस्टाईल प्रकारात त्याने हा पराक्रम केला. पुढच्या म्हणजे २0१२च्या लंडन आॅलिम्पिकमध्ये सुशील याने एक पाऊ ल पुढे टाकताना रौप्यपदकाची कमाई केली. याच स्पर्धेत दिल्लीच्या हनुमान आखाड्याचा सुशील याचा सहकारी योगेश्वर दत्त याने ६0 किलो फ्रीस्टाईलमध्ये कांस्यपदक मिळविले. एकूण काय तर तीन मल्लांनी मिळून एक रौप्य आणि तीन कांस्य अशी चार पदके भारताच्या झोळीत टाकली आहेत.
२0१६च्या रिओ आॅलिम्पिकसाठी पाच पुरुष आणि तीन महिला अशा आठजणांनी कुस्तीमध्ये पात्रता मिळविली आहे. पण, यात ७४ किलो गटात भारताचे प्रतिनिधित्व कोणी करायचे यावरून उठलेला वाद अजूनही मिटलेला नाही. ७४ किलो फ्रीस्टाईल गटात नरसिंग यादव याने भारताला आॅलिम्पिक कोटा मिळवून दिला. त्यामुळे या गटातून तो देशाचे प्रतिनिधित्व करेल, असे अपेक्षित होते. पण, सुशीलकुमार आणि त्याचे गुरू सतपाल यांनी या दोघांमध्ये चाचणी घेण्याची मागणी केली. महासंघाने ती न जुमानता नरसिंग याचे नाव फायनल केले. याला सुशील याने न्यायालयात आव्हान दिले. न्यायालयाने यात हस्तक्षेप करण्यास नकार देत महासंघाला निर्णयाचा अधिकार असल्याचे सांगितले. त्यामुळे नरसिंग याची रिओ वारी नक्की झाली; पण रविवारी नरसिंग उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळल्याचे वृत्त आले आणि पुन्हा खळबळ माजली. हे आपल्याविरुद्ध कुभांड रचण्यात आल्याचे नरसिंग याने म्हटले आहे. महासंघानेही नरसिंग याचा इतिहास स्वच्छ असून, त्याच्यविरुद्ध हा कट रचण्यात आल्याचे म्हटले आहे. सध्या नरसिंग याचे अस्थाई निलंबन झाले असल्याने ७४ किलो वजन गटातील प्रतिनिधित्वाचा निर्णय नंतर घेण्यात येणार आहे. यातून काय निष्पन्न होईल हे आताच सांगता येणार नसले तरी नरसिंग आणि सुशील यांच्यातील ‘नुरा’ कुस्तीने इतिहासातील एक अध्याय मात्र काळवंडला आहे, एव्हढे मात्र निश्चित !

आॅलिम्पिक पदक विजेते मल्ल...
खाशाबा जाधव......कांस्यपदक (१९५२ हेलसिंकी)
सुशीलकुमार..........कांस्यपदक (२00८ बीजिंग)
रौप्यपदक (२0१२ लंडन)
योगेश्वर दत्त...........कांस्यपदक (२0१२ लंडन)

Web Title: 'Nura' Wrestling History of Kalvand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.