ओह... मारिया!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2016 03:29 AM2016-03-20T03:29:40+5:302016-03-20T03:29:40+5:30

टेनिससुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने आपण डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरल्याचा खुलासा करून टेनिसविश्वात खळबळ उडवली. विशेष म्हणजे जागतिक महिला

Oh ... Maria! | ओह... मारिया!

ओह... मारिया!

Next

(विशेष)
- रोहित नाईक

टेनिससुंदरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाच्या मारिया शारापोव्हाने आपण डोपिंग टेस्टमध्ये अपयशी ठरल्याचा खुलासा करून टेनिसविश्वात खळबळ उडवली. विशेष म्हणजे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला तिने पत्रकार परिषद घेत याबाबतची कबुली दिल्याने सर्वांनाच
धक्का दिला. यानंतर अनेक चर्चांना ऊत आला. तिच्यावर तात्पुरती बंदी आली, अनेक कंपन्यांनी तिच्यासोबतचा व्यावसायिक करार मोडला व काही खेळाडूंनी टीकाही केली. त्याच वेळी काहींनी पाठराखण करून तिला धीरही दिला. परंतु तिच्याकडून झालेली चूक अनावधनाने झाली यावर मात्र कोणीच बोलले नाही.

डोपिंगमध्ये दोषी आढळणे हे नक्कीच गौरवास्पद नाही. ही एकप्रकारची चीटिंगच आहे. मात्र शारापोव्हाकडून चूक मुद्दामहून झाली नसून नकळतपणे झाली आहे. तरीही ती पूर्णपणे निर्दोष आहे, असेही नाही. आपण सेवन करीत असलेले औषध डोपिंग लिस्टमध्ये आहे की नाही हे पडताळून पाहणे प्रत्येक खेळाडूचे कर्तव्य आहे. शारापोव्हा ज्या औषधाचे सेवन करीत होती ते ‘मिल्ड्रोनेट’ औषध जागतिक डोपिंगविरोधी संघटनेच्या (वाडा) निषिद्ध यादीत असल्याबाबत शारापोव्हाला कल्पना नव्हती.
विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांपासून सेवन करीत असलेल्या औषधाविषयी साहजिकच कोणीच संशय बाळगणार नाही. त्यामुळेच डोपिंग चाचणीमध्ये शारापोव्हा नकळतपणे अडकली गेली. ही झाली एक बाजू. पण ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे या प्रकरणाची दुसरी बाजू तपासून पाहणेही महत्त्वाचे आहे. मुळात शारापोव्हा नवोदित किंवा टेनिसविश्वाचे नियम माहीत नसलेली खेळाडू नाही. पाच ग्रँडस्लॅम विजेती असल्याने जेव्हा डोपिंगमध्ये अयशस्वी ठरल्याचे वृत्त आले तेव्हा साहजिकच संपूर्ण जगाला आश्चर्य वाटले. ती आधुनिक टेनिसचा एक चेहरा आहे. त्यामुळेच ‘वाडा’ने जानेवारी महिन्यात जाहीर केलेल्या निषिद्ध औषधांच्या नव्या यादीविषयी शारापोव्हाने माहिती ठेवणे आवश्यक होते. शारापोव्हाच्या या प्रकरणानंतर युवा खेळाडूंनीही बोध घ्यावा. आपण ज्या खेळामध्ये कारकिर्द करतो त्या खेळाचा मान राखला गेला पाहिजे. कोणत्याही औषधाचे सेवन करताना ते औषध ‘वाडा’च्या ब्लॅक लिस्टमध्ये नसल्याची खात्री करावी. आपल्यामुळे खेळाची प्रतिमा डागाळली असल्याची जाणीव असल्यानेच शारापोव्हाने आपल्या चुकीची जाहीर कबुली दिली. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने (आयटीएफ) केलेल्या निलंबनाच्या कारवाईला सामोरे जाऊन नव्याने भरारी घेत स्वत:ला सिद्ध करण्याचे मोठे आव्हान शारापोव्हासमोर असेल.

शारापोव्हा का घेत होती ‘मिल्ड्रोनेट’?
मधुमेह आणि मॅग्नेशियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी मारिया शारापोव्हा या औषधाचे सेवन करीत होती.
छातीत दुखणे व हृदयाचा झ्टका टाळण्यासाठीही हे औषध घेतले जाते.
विशेष म्हणजे, या औषधामुळे खेळाडूंच्या कामगिरीवरही परिणाम होतो असे काही डॉक्टर्सचे मानणे आहे.
दखल घेण्याची बाब
म्हणजे एकाच महिन्यात
या औषधामुळे तब्बल ७ खेळाडू डोपिंग चाचणीमध्ये अपयशी ठरले.


करारांवर परिणाम...
मारिया शारापोव्हा टेनिसविश्वात सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू. तिचे ग्लॅमर आणि प्रसिद्धी या जोरावर अनेक कंपन्यांनी तिच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली. मात्र ज्या वेळी शारापोव्हाने डोपिंग टेस्टचा खुलासा केला, त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपल्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदावरून शारापोव्हाला दूर केले.
काही वर्षांपूर्वी एका जाहिरातीमध्ये भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग म्हणायचा की, ‘जब तक बल्ला चलता है ठाट है, मगर जब बल्ला नही चलेगा तब...’ काहीसे असेच शारापोव्हाच्या बाबतीत झाले.
आज तिच्यावर आयटीएफनेही तात्पुरती बंदी आणली. मात्र २८ वर्षीय शारापोव्हा जेव्हा पुनरागमन करेल, तेव्हा ती पुन्हा एकदा जुन्या अंदाजात बहरेल आणि तेवढी तिची क्षमता नक्कीच आहे. त्या वेळी पुन्हा एकदा अनेक कंपन्या तिच्यापुढे उभ्या राहतील.
कठीण काळात साथ सोडलेल्या या व्यावसायिक संस्थांशी शारापोव्हा पुन्हा जुळवून घेईल का? त्यामुळेच नवोदित खेळाडूंसाठी शारापोव्हाच्या निमित्ताने का होईना, मोठा धडा मात्र नक्की मिळाला आहे.

Web Title: Oh ... Maria!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.