ओह.. नो.. जोकोविच आऊट...

By admin | Published: January 20, 2017 05:26 AM2017-01-20T05:26:44+5:302017-01-20T05:26:44+5:30

जागतिक क्रमवारीतील द्वितीय खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला दुसऱ्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागल्याने आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेत खळबळ माजली

Oh no .. Djokovic out ... | ओह.. नो.. जोकोविच आऊट...

ओह.. नो.. जोकोविच आऊट...

Next


मेलबर्न : गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील द्वितीय खेळाडू सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला दुसऱ्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागल्याने आॅस्टे्रलियन ओपन स्पर्धेत खळबळ माजली. जागतिक क्रमवारीत तब्बल ११७ व्या स्थानी असलेल्या उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिनने जोकोविचला चार तास ४८ मिनिटांच्या रोमांचक मॅरेथॉन लढतीत मात दिली. दुसरीकडे, महिला गटात बलाढ्य सेरेना विलियम्सने सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत सहज आगेकूच केली.
आॅस्टे्रलियन ओपनमध्ये तब्बल सहावेळा बाजी मारलेल्या जोकोविचला तब्बल ५ सेटपर्यंत रंगलेल्या थरारक लढतीत डेनिसविरुध्द ६-७, ७-५, ६-२, ६-७, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे २००८ सालच्या विम्बल्डननंतर पहिल्यांदाच जोकोला ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभवास सामोरे जावे लागले. त्यावेळी, मरात साफिनने जोकोचे आव्हना संपुष्टात आणले होते. दरम्यान, या पराभवानंतर आॅस्टे्रलियाचे दिग्गज टेनिसपटू राय इमर्सन यांच्या विक्रमी ६ आॅस्टे्रलियन विजेतेपदांची कामगिरी मागे टाकण्यात जोकोला अपयश आले. १९६०च्या दशकात इमर्सन यांनी सहा आॅस्टे्रलियन जेतेपद पटकावली होती.
पहिल सेट गमावून पिछाडीवर पडल्यानंतर जोकोविचने दुसऱ्या सेटमध्ये झुंजार खेळ करत बरोबरी साधली. तर तिसऱ्या सेटमध्ये वेगवान खेळ करताना त्याने २-१ अशी आघाडी मिळवली. मात्र, डेनिसने अखेरपर्यंत हार न मानता यानंतर सलग दोन सेटमध्ये बाजी मारत सनसनाटी विजयाची नोंद केली.
महिलांमध्ये अमेरिकेच्या बलाढ्य सेरेनाने लूसी सॅफरोवाचे आव्हान ६-३, ६-४ असे सहजपणे संपुष्टात आणले. त्याचवेळी, तृतीय मानांकीत एग्निस्का रादवांसकाला मात्र स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला. क्रोएशियाच्या मिरजाना लुसिस बारोनीने रादवांसकाला ६-३, ६-२ असा अनपेक्षित धक्का दिला.
ब्रिटनच्या जोहाना कोंटाने देखील आपली विजयी घोडदौड कायम राखताना जपानच्या नाओमी ओसाकाचे आव्हान ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले. पुढच्या फेरीत कोंटापुढे माजी अव्वल खेळाडू कॅरोलिन वोजनियाकीचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)
जोकोविचच्या अनपेक्षित पराभवानंतर अनेक खेळाडूंसाठी जेतेपदाची संधी निर्माण झाली आहे. यामध्ये अव्वल खेळाडू अँडी मरे आणि १७ ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर यांचे नाव आघाडीवर घ्यावे लागेल. त्याचवेळी या पराभवानंतर जोकोच्या फॉर्मवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून गतवर्षी फ्रेंच ओपन पटकावल्यानंतर त्याला आपल्या लौकिकानुसार कामगिरी करता आलेली नाही.
डेनिसच्या या अनपेक्षित विजयामुळे जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मिलोस राओनिकचे सुटकेचा निश्वास टाकला असेल. कारण, उपांत्य सामन्यात त्याला जोकोविचविरुध्द भिडावे लागले असते. त्याचवेळी त्याने आजारी असताना स्पर्धेत विजयी कूच करताना जाइल्स मुलरला ६-३, ६-४, ७-६ असे नमविले.
>लिएंडर पेसचे ‘पॅकअप’
पुरुष दुहेरीचा पहिला दिवस भारतीयांसाठी निराशाजनक ठरला. दिग्गज खेळाडू लिएंडर पेससह दिविज शरण - पूरव राजा या जोडीला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पेस आणि आंद्रे सा (ब्राझील) या जोडीला तीन सेटपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत टरीट हुए - मॅक्स मिरनी यांच्याविरुध्द ६-४, ६-७, ४-६ असा पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे याआधी पेस - आंद्रे जोडीने हुए - मिरनी यांना आॅकलंड क्लासिक स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नमवले होते. त्याचवेळी, पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात चेन्नई ओपनमध्ये उपविजेता ठरलेल्या राजा - शरण जोडीला फ्रान्सच्या जोनाथन इसेरिक - फॅब्रिस मार्टिन यांनी ७-६, ७-६ असा धक्का दिला.
>डेनिसने निश्चितच आपल्या स्तराहून उच्च दर्जाचा खेळ केला. त्याला विजयाचे श्रेय द्यावेच लागेल. या सामन्यात अनेक गोष्टी त्याच्याबाजूने गेल्या. सामना जिंकण्यावर त्याचा हक्कच होता. यात काहीच शंका नाही की, डेनिस प्रतिकूल परिस्थितीतून पुढे आलेला शानदार खेळाडू आहे. खरं म्हणजे या सामन्यात मी जास्त काही करु शकलो नाही.
- नोव्हाक जोकोविच.
>हा विजय माझ्यासाठी सर्वांत मोठा आहे. तसेच हा विजय माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्णही आहे. - डेनिस इस्तोमिन

Web Title: Oh no .. Djokovic out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.