कॅप्टन विराटसमोर जुनीच समस्या
By admin | Published: January 12, 2015 01:41 AM2015-01-12T01:41:32+5:302015-01-12T01:41:32+5:30
भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली
सिडनी : भारताचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली. मात्र, धोनीच्या नेतृत्वाचा वारसा पुढे चालवण्यासाठी आतूर असलेल्या नव्या कर्णधाराला अवघ्या दोन सामन्यांत धोनी आत्तापर्यंत झगडत असलेल्या समस्येची जाण झाली. नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चोख प्रत्युत्तर दिले. मात्र, भारताकडे प्रभावी मारा करणारे गोलंदाज नसल्यामुळे हा मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागला. कोहलीनेही मालिकेनंतर भारताला नव्या गोलंदाजांची आवश्यकता असल्याचे मान्य केले.
कसोटी मालिकेतील भारताच्या पाच फलंदाजांच्या सरासरीचा विचार केल्यास तो आॅसीच्या फलंदाजांपेक्षा अधिक आहे. भारताच्या चार फलंदाजांनी एकतरी शतक ठोकले, तर आॅस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना ते करण्यात यश आले. विशेष म्हणजे यापूर्वी विराट वगळता भारतीय संघात अॅडिलेडमध्ये खेळण्याचा अनुभव कोणाकडेच नव्हता. याउलट आॅसी संघाच्या प्रत्येकाने फलंदाजी केली आहे. या सर्वाची तुलना केल्यास भारतीय फलंदाज यजमानांना पुरून उरले. मात्र, नाण्याची केवळ एकच बाजू भक्कम असून चालत नाही. चढ-उतारांच्या या मालिकेत फलंदाजांनी निर्णायक क्षणी स्वत:ला सिद्ध करून एक बाजू तारली, परंतु गोलंदाजांनी निराश केले. याउलट आॅसीच्या फलंदाजांच्या खांद्याला खांदा लावून गोलंदाज लढले.