'तिने चुंबन घेतले आणि मी अडकलो', ऑलिम्पिक विजेता अमेरिकन धावपटू गिल रॉबर्टचा दावा लवादाला मान्य
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 01:09 PM2018-01-27T13:09:55+5:302018-01-27T13:10:01+5:30
'मी प्रतिबंधित शक्तिवर्धक द्रव घेतलेले नाही, तर माझ्या मैत्रिणीने भावनेच्या वेगात घेतलेल्या चुंबनांच्या माध्यमातून ते माझ्या शरीरात आले असावेत. मी जाणूनबुजून ड्रग्ज घेतलेले नाहीत म्हणून मला निर्दोष मानून निलंबन रद्द करावे," असा दावा अमेरिकेचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता धावपटू गिल रॉबर्ट याने केला
न्यू यॉर्क- 'मी प्रतिबंधित शक्तिवर्धक द्रव घेतलेले नाही, तर माझ्या मैत्रिणीने भावनेच्या वेगात घेतलेल्या चुंबनांच्या माध्यमातून ते माझ्या शरीरात आले असावेत. मी जाणूनबुजून ड्रग्ज घेतलेले नाहीत म्हणून मला निर्दोष मानून निलंबन रद्द करावे," असा दावा अमेरिकेचा ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता धावपटू गिल रॉबर्ट याने केला आणि क्रीडा लवादाच्या पीठाने तो मान्यसुध्दा केला. त्यामुळे अमेरिकेला रिओ |लिम्पिकमध्ये 400 मीटर रिलेचे सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या या धावपटूचे निलंबन टळले.
या गमतीशीर घटनेच्या मुळात आपल्या भारताचेही कनेक्शन आहे. पार्श्वभूमी अशी की 24 मार्च 2017 रोजी रॉबर्टची प्रतिबंधित द्रवासाठी अमेरिकन अँटी डोपींग एजन्सीतर्फे चाचणी घेण्यात आली आणि त्यात तो 'प्रोबेनेसीड' नावाचे प्रतिबंधीत द्रव सेवनप्रकरणी दोषी आढळला. त्यानंतर त्याचे बी सॅम्पलही पॉझिटिव्ह आले म्हणून त्याला मे 2017 पासून निलंबित करण्यात आले होते आणि या निलंबनाला त्याने दिलेल्या आव्हानावर अमेरिकेच्या 'द कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट'समोर सुनावणी सुरु होती. त्या सुनावणीदरम्यान रॉबर्टने चुंबनाचा हा गमतीशीर दावा गुरुवारी केला आणि लवादाने तो मान्य करत जागतिक प्रतिबंधित द्रव विरोधी संस्था (वाडा) चा रॉबर्टला निलंबित करण्याचा निर्णय रद्दबातल ठरवला.
आता यात भारताचा संबंध म्हणजे इंडियन कनेक्शन कुठे येते तर ते असे...रॉबर्टच्या मैत्रिणीच्या सावत्र वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार रॉबर्टच्या मैत्रिणीचे नाव अॅलेक्स सलाझार. ही बया मार्च 2017 च्या काही आठवडे आधी भारतात आली होती आणि तिला इकडे 'सायनस इन्फेक्शन' झाले. त्यामुळे स्थानिक केमिस्टने तिला दोन आठवड्यांसाठी दररोज 'मॉक्झिलाँग' कॅप्सूल घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अॅलेक्स ही औषधं घेत होती. भारतातून परतताना अमेरिकेतही तिने ही औषधी सोबत नेली आणि 24 मार्च 2017 रोजी नेमकी रॉबर्टची चाचणी होण्याच्या तीन तास आधीच तिने ही कॕप्सूल घेतली होती. बरे ही कॅप्सूल ती गिळत नव्हती तर ती उघडून त्यातील पावडर पाण्यासह घेण्याची तिची पध्दत होती.
त्यामुळे त्या 24 मार्चला तिने माझे चुंबन घेण्याआधी ही औषधी घेतलेली असावी आणि त्यामुळे माझ्या शरीरात प्रोबेनेसिड हे ड्रग मिळून आले असावे. या चुंबनामुळे मी गोत्यात येईल किंवा अॕलेक्स अशी काही औषधी घेतेय याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती असा दावा रॉबर्टने केला आणि तो मान्य करण्यात आल्याने त्याच्यावरील निलंबनाचे बालंट टळले.
आश्चर्य म्हणजे चुंबनापायी असा अडचणीत आलेला आणि सहीसलामत सुटलेला गिल रॉबर्ट हा काही पहिलाच खेळाडू नाही. त्याच्याआधी टेनिसपटू रिचर्ड गास्केट व कॅनेडियन पोल व्हॉल्टर शॉन बार्बर हेसुध्दा अशाच चुंबनातून कोकेन सेवनाचे दोषी पकडले गेले होते परंतु त्यांचीही चुंबनकथा ऐकून सुटका झाली होती.