२०२१ ला देखील आॅलिम्पिकचे आयोजन शंकास्पद - सीईओ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 05:25 AM2020-04-11T05:25:55+5:302020-04-11T05:26:08+5:30
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी याच आठवड्यात संपूर्ण देश लॉकडाऊन करीत असल्याची घोषणा केली होती.
टोकियो : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस जगभर वाढतच आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असताना मृत्युदरदेखील वाढत चालला आहे. या स्थितीत १६ महिन्यांसाठी लांबणीवर टाकण्यात आलेले टोकिओ आॅलिम्पिकचे आयोजन २०२१ मध्ये होईलच, याबाबत खुद्द टोकियो आॅलिम्पिकचे मुख्य कार्यकारी तोशिरो मुतो यांनी शंका व्यक्त केली आहे.
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी याच आठवड्यात संपूर्ण देश लॉकडाऊन करीत असल्याची घोषणा केली होती. यासंदर्भात सविस्तर माहिती देताना सीईओ मुतो म्हणाले, ‘पुढील वर्षीच्या जुलै महिन्यात आॅलिम्पिकचे आयोजन होईलच याची कोणी शाश्वती देऊ शकेल, असे मला वाटत नाही. मीदेखील तुम्हाला स्पष्ट उत्तर देण्याच्या स्थितीत नाही.’ पंतप्रधान आबे हे स्वत: आॅलिम्पिक आयोजन यंदा करण्यास उत्सुक असल्याने कोरोनाचे संकट थोपविण्यासाठी त्यांनी जपानमध्ये जलद उपाययोजना करण्यास उशीर लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
टोकियो आॅलिम्पिकचे आयोजन आता २३ जुलै २०२१ तर पॅरालिम्पिकचे आयोजन २४ आॅगस्टपासून आयोजित करण्याचे निश्चित झाले आहे. (वृत्तसंस्था)