छंदासाठी कायपण; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्याची 26व्या वर्षी निवृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 03:51 PM2019-08-07T15:51:37+5:302019-08-07T15:51:59+5:30
रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटू ख्रिस मिअर्सने बुधवारी निवृत्ती जाहीर केली.
लंडन : रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जलतरणपटू ख्रिस मिअर्सने बुधवारी निवृत्ती जाहीर केली. 26 वर्षीय ख्रिसला म्युझिकचा छंद जोपासायचा आहे. त्यामुळे त्यानं निवृत्ती घेतली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने जॅक लॉफर याच्यासह डाइव्हिंगच्या तीन मीटर सिंक्रोनाईज इव्हेटमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. डिसेंबर 2018पासून त्यानं खेळापासून विश्रांती घेतली होती.
ख्रिस म्हणाला,''माझा हा थक्क करणारा प्रवास आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून केलेली सुरुवात, आई-वडिलांचे निधन, ऑलिम्पिक चॅम्पियन. या प्रवासात मी अनेक मित्र कमावले. बरे वाईट अनुभव अनुभवले. चुकांमधून शिकलो.''
ख्रिसने 2014 व 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. शिवाय 2016 व 2018च्या युरोपियन अजिंक्यपद स्पर्धेत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक त्याच्या नावावर आहे. 2015च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याला कांस्यपदक पटकावण्यात यश आले होते. 2015पासून तो निर्माता आणि DJ म्हणूनही काम करत आहे. त्याला आता याच क्षेत्रात काम करायचे आहे.