ऐकावे ते नवलंच... टाकाऊ ई-वेस्टपासून बनवणार ऑलिम्पक पदके
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 02:44 PM2019-02-11T14:44:38+5:302019-02-11T14:47:49+5:30
या प्रोजेक्टनुसार 16.5 किलो सोने आणि 1800 किलो चांदी जमा करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : जपान हा सध्याच्या घडीला टेक्नॉलॉजीमधील अव्वल देश समजला जातो. या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून जपानमध्ये ऑलिम्पकचे मेडल्स बनवले जाणार आहे. तुम्हाला या गोष्टीवर कदाचित विश्वास बसणार नाही. पण जपानची राजधानी टोकिओ येथे 2020 साली ऑलिम्पिक होणार आहे आणि यावेळी पदकांची निर्मिती ई-वेस्टपासून बनवण्यात येणार आहे.
जुलै-ऑगस्ट 2020 साली टोकिओ येथे ऑलिम्पिक होणार आहे. या ऑलिम्पिकमध्ये 16% प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यानुसार जपानमध्ये 2017 सालापासून राष्ट्रव्यापी प्रोजेक्ट सुरु करण्यात आला आहे. या राष्ट्रव्यापी प्रोजेक्टनुसार ई-वेस्ट जमा करालयला सुरुवात केली आहे. आतापर्यंत या प्रोजेक्टनुसार 16.5 किलो सोने आणि 1800 किलो चांदी जमा करण्यात आली आहे. जून 2018पर्यंत 2700 किलो कांस्य यापूर्वीच जमा करण्यात आले आहे. टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण पाच हजार पदके दिली जाणार आहेत.
जपानने कसा राबवला हा उपक्रम
जपानच्या सरकारने देशवासियांना आपल्या जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू देण्याचे आवाहन केले होते. यामध्ये स्मार्टफोन, डिजिटल प्रोडक्ट, लॅपटॉप, कॅमेरासारख्या गोष्टी लोकांनी दान केल्या. गेल्या 18 महिन्यांमध्ये 50 हजार टन ई-वेस्ट जमा करण्यात आला.
प्रदूषण कमी करण्यासाठी 29 हजार करोडचा खर्च
टोकिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्यावेळी प्रदूषण कमी व्हावे यासाठी तब्बल 29 हजार करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. 2016च्या रिओ ऑलिम्पिकपेक्षा टोकिओमध्ये 16 टक्के प्रदूषण कमी करण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे. त्यामुळे ऑलिम्पिकचे स्टेडियम बनवण्यासाठी 87 टक्के लाकडी गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे.