निर्मला शेरॉनला आॅलिम्पिक पात्रता
By admin | Published: July 2, 2016 05:52 AM2016-07-02T05:52:38+5:302016-07-02T05:52:38+5:30
भारतीय धावपटू निर्मला शेरॉनने ४00 मीटर धावण्याच्या शर्यतीत आॅलिम्पिक पात्रता मिळवली आहे.
हैदराबाद : भारतीय धावपटू निर्मला शेरॉनने ४00 मीटर धावण्याच्या शर्यतीत आॅलिम्पिक पात्रता मिळवली आहे. येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय वरिष्ठ अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये तिने आज, शुक्रवारी ५१.४८ सेकंदाची वेळ नोंदवून तिने हे उदिष्ट साध्य केले. याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी रिले शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.
जीएमसी बालयोगी स्टेडीयमवर सुरु असलेल्या स्पर्धेत निर्मलाने आपली यापूर्वीची ५२.३५ सेकंदाची आणि एम. आर पुवम्मा हिने नोंदवलेली ५१.७३ सेकंदाची वेळ मागे टाकत आॅलिम्पिक तिकीट मिळवले. हरियानाच्या निर्मलाने शर्यतीत सुरवातीपासून शेवटपर्यंत निर्णायक आघाडी मिळवली होती. रियो आॅलिम्पिकच्या पात्रतेसाठी ५२.२0 सेकंदाहून कमी वेळ नोंदवणे आवश्यक होते.
निर्मला रियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणारी भारताची २४ वी अॅथलिट ठरली.
पी. टी उषाची शिष्या असलेल्या जिस्ना मॅथ्यूने ५३.१४ सेकंदासह रौप्यपदक तर तामिळनाडूच्या पी, एन. सौदर्या हिने ५३.८५ सेकंदाची वेळ नोंदवून कांस्यपदक पटकाले.
महिलांच्या ४ बाय ४00 मीटर रिले शर्यतीत महाराष्ट्राच्या महिलांनी सुवर्णपदक जिंकले. ऋचा पाटील, श्रध्दा घुले, भाग्यश्री शिर्के आणि अक्षया अय्यर यांच्या संघाने ही कामगिरी केली. त्यांनी ४७.२६ सेकंदाची वेळ नोंदवून हे सुवर्णपदक आपल्या नावावर केले.