Olympics 2021 Wrestling: भारतासाठी पदक जिंकू शकणाऱ्या विनेश फोगाटचं गीता-बबिताशी असलेलं नातं माहीत आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 01:47 PM2021-08-03T13:47:08+5:302021-08-03T13:54:29+5:30
राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू म्हणजे विनेश फोगाट...
- प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार यांना मी एक विनंती करू इच्छिते की, माझ्या जीवनप्रवासाबद्दल काहीही लिहिण्यापूर्वी माझ्याबाबतची खरी माहिती तपासूनच लिखाण करा किंवा वार्तांकन करा....
- मी ९ वर्षांची असताना माझ्या वडिलांचे निधन झाले आणि राजपाल फोगाट असे त्यांचे नाव आहे. कोणत्याही प्रकारच्या जमिनिच्या वादातून त्यांचा मृत्यू झालेला नाही. माझ्या आईनं काबाडकष्ट करून माझा भाऊ, मला आणि बहिणीला वाढवले.
- महावीर फोगाट हे माझ्या वडिलांचे मोठे भाऊ आहेत. अनेक जण त्यांना माझे वडील असे सांगत आहेत. असे वार्तांकन करण्यापूर्वी जरा सत्यता तपासून घ्या.
- मी माझ्या वडिलांचा आदर करते आणि अशा प्रकारच्या बातम्या वाचून मला दुःख होते.
- विनेश फोगाट, भारताची कुस्तीपटू...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कुस्ती अभियानाची सुरुवात पराभवानं झाली. भारताची महिला कुस्तीपटू सोनम मलिक हिला ६२ किलो वजनी गटाच्या पहिल्याच लढतीत २-० अशा आघाडीनंतरही मंगोलियाच्या बोलोर्तुया खुरेलखूकडून पराभव पत्करावा लागला. मंगोलियाची ही खेळाडू पुढच्याच फेरीत पराभूत झाल्यानं सोनमची रिपिचेज राऊंडची आशाही संपुष्टात आली. पण, महिला कुस्तीपटूंमध्ये भारतीयांच्या नजरा खिळल्या आहेत त्या विनेश फोगाट ( Vinesh Phogat) हिच्या कामगिरीवर... रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दुखापतीमुळे विनेशला माघार घ्यावी लागली होती. पण, टोकियोत ती ५३ किलो वजनी गटातील पदकाची प्रबळ दावेदार म्हणून परतली आहे...
आमीर खानच्या 'दंगल' चित्रपटानं फोगाट भगिनींची जगाला ओळख करून दिली. गीता, बबिता या त्यातल्या प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. या चित्रपटनंतर अनेकांना विनेश ही गीता, बबिताची सख्खी बहिण असल्याचे वाटणे साहजिकच होते आणि त्याला मीडियाही अपवाद ठरली नाही. त्यामुळेच विनेशनं काही दिवसांपूर्वी सर्वांना कळकळीची विनंती केली...
कोण आहे विनेश फोगाट?
राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू म्हणजे विनेश फोगाट... Laureus World Sports Awards साठी नामांकन मिळालेली पहिली भारतीय खेळाडू विनेश फोगाट... २०१९मध्ये तिला हे नामांकन मिळाले होते. विनेश ही गीता व बबिता यांची चुलत बहीण आहे. महाविर सिंग फोगाट यांचा लहान भाऊ राजपाल यांची ती मुलगी. मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवण्याच्या कुटुंबीयांच्या निर्णयाला समाजातून तीव्र विरोध झाला, परंतु त्यांचा दृढ निश्चय ते तोडू शकले नाही.
२५ ऑगस्ट १९९४ साली हरयाणाच्या भिवानी जिल्ह्यात विनेशचा जन्म झाला. चुलत बहिणी गीता व बबिता यांना कुस्ती खेळताना पाहून विनेशचीही या खेळाकडील ओढी वाढली. गीतानं २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले तेव्हा विनेश १६ वर्षांची होती. आपल्या बहिणींना कुस्तीत यश मिळवताना पाहून आपणही भविष्यात अशी कामगिरी करू असा निर्धार तिनं मनाशी पक्का केला होता. २०१४च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकून विनेश पहिल्यांदा चर्चेत आली. त्याचवर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत तिनं ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.
२०१८मध्ये तिनं आशियाई व राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये ५० किलो वजनी गटात सुवर्ण जिंकून इतिहास घडवला.
२०१९मध्ये जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ५३ किलो वजनी गटात तिनं कांस्यपदक जिंकले आणि याच वजनी गटातून ती टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत उतरणार आहे. विनेशचा फॉर्म पाहता ती यंदा जेतेपदाची प्रबळ दावेदार आहे. १३ डिसेंबर २०१८मध्ये तिनं कुस्तीपटू सोमवीर राठी याच्यासोबत विवाह केला. २०११पासून ही दोघं एकमेकांना ओळखत होती आणि दोघंही भारतीय रेल्वेत कामाला असताना एकमेकांच्या प्रेमात पडले.