ओमानचा खळबळजनक विजय

By admin | Published: March 10, 2016 03:25 AM2016-03-10T03:25:19+5:302016-03-10T03:25:19+5:30

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल लावण्यात तरबेज असलेल्या आयर्लंडला बुधवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. नवख्या ओमानने आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेची विजयी

Oman's thrilling win | ओमानचा खळबळजनक विजय

ओमानचा खळबळजनक विजय

Next

धरमशाला : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल लावण्यात तरबेज असलेल्या आयर्लंडला बुधवारी अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. नवख्या ओमानने आपल्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेची विजयी सुरुवात करताना पात्रता फेरीत तुलनेत बलाढ्य असलेल्या आयर्लंडला २ विकेटने नमवण्याचा पराक्रम केला.
सलामीवीर झिशान मकसूद (३८), खवार अली (३४) व मोक्याच्या क्षणी निर्णायक फटकेबाजी करणारा आमेर अली (३२) यांच्या जोरावर ओमानने १५५ धावांचे लक्ष २ चेंडू राखून पार केले. अखेरच्या षटकात ओमानला १५ धावांची आवश्यकता असताना मॅक्स सोरेन्सनने केलेल्या सुमार गोलंदाजीचा फायदा घेत ओमानने खळबळजनक विजय मिळवला. विजयानंतर ओमानच्या खेळाडूंनी विश्वचषक पटकावल्याच्या अंदाजात जल्लोष केला.
धावांचा पाठलाग करताना आक्रमक फटकेबाजीने ओमानने आयर्लंडला धोक्याचा इशारा दिला. झिशानने ३३ चेंडंूत ६ चौकारांसह ३३ धावा फटकावल्या. तर, खवारने ४ चौकार व २ षटकारांसह २६ चेंडंूत ३४ धावा कुटल्या. भारतीय वंशाच्या जतिंदर सिंगनेदेखील २४ धावांची संयमी खेळी करून मोलाचे योगदान दिले. मात्र, अखेरच्या क्षणी आयर्लंडची सामन्यावर पकड असताना मैदानात आलेल्या आमेरने १७ चेंडंूत ५ चौकार व एका षटकारासह ३२ धावा फटकावत सामन्याचे चित्र पालटले. आयर्लंडकडून केविन ओब्रायन, अँडी मॅकब्रायन आणि सोरेन्सन यांनी प्रत्येकी २ बळी घेत ओमानला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.
तत्पूर्वी, आयर्लंडने नवख्या ओमान विरुद्ध निर्धारित षटकांत ५ बाद १५४ धावांची समाधानकारक मजल मारली. यष्टिरक्षक गॅरी विल्सनने (३६) केलेल्या निर्णायक फलंदाजीच्या जोरावर आयर्लंडला दीडशेचा टप्पा गाठण्यात यश आले. मुनीस अन्सारीने ३७ धावांत ३ खंदे फलंदाज बाद करून आयर्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
आयर्लंड : २० षटकांत ५ बाद १५४ धावा (गॅरी विल्सन ३८, पॉल स्टर्लिंग २९, विलियम पोर्टरफिल्ड २९; मुनिस अन्सारी ३/३७) पराभूत वि. ओमान : १९.४ षटकांत ८ बाद १५७ धावा (झिशान मकसूद ३८, खवार अली ३४, आमेर अली ३२; अँडी मॅकब्रायन २/१५, केविन ओब्रायन २/२५, मॅक्स सोरेन्सन २/२९)
>>>>>>>>>>>
बांगलादेशची बाजी
धरमशाला : अखेरच्या क्षणापर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बांगलादेशाने टी-२० विश्वचषक पात्रता फेरीमध्ये विजयी सलामी देताना झुंजार नेदरलँड्सचे कडवे आव्हान ८ धावांनी परतावले.
हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात सलामीवीर तमीम इक्बालच्या आक्रमक ८३ धावांच्या जोरावर १५३ धावांची मजल मारलेल्या बांगलादेशाने नेदरलँड्सला निर्धारित षटकांत ७ बाद १४५ धावांत रोखण्यात यश मिळविले. संक्षिप्त धावफलक :
बांगलादेश : २० षटकांत ७ बाद १५३ धावा (तमीम इक्बाल ८३, सौम्य सरकार १५, शब्बीर रहमान १५; टीम वॅन डेर गुगटन ३/२१, पॉल वॅन मिकेरेन २/१७) वि. वि. नेदरलँड्स : २० षटकांत ७ बाद १४५ धावा. (स्टीफन मायबर्ग २९, पीटर बॉरेन २९, बेन कूपर २०; अल् अमीन हुसेन २/२४, शाकीब अल् हसन २/२८).

Web Title: Oman's thrilling win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.