वन-डेसाठी गुरकिरत नवा चेहरा
By admin | Published: September 21, 2015 12:08 AM2015-09-21T00:08:46+5:302015-09-21T00:08:46+5:30
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी आज जाहीर झालेल्या भारतीय संघात पंजाबचा युवा अष्टपैलू गुरकिरत सिंग मान हा एकमेव नवा चेहरा आहे
टी-२० संघात अरविंदचा समावेश : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघ जाहीर
बंगळुरू : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी आज जाहीर झालेल्या भारतीय संघात पंजाबचा युवा अष्टपैलू गुरकिरत सिंग मान हा एकमेव नवा चेहरा आहे, तर कर्नाटकचा डावखुरा वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंद याला टी-२० संघात स्थान देण्यात आले आहे. २५ वर्षीय गुरकिरतला भारत ‘अ’ संघातर्फे मर्यादित षटकांच्या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्याची भेट मिळाली, तर अरविंदचे टी-२० संघात चार वर्षांच्या कालावधीनंतर पुनरागमन झाले. यापूर्वी त्याची संघात निवड झाली होती, पण त्याला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये महेंद्रसिंह धोनी दोन्ही संघांचे नेतृत्व करणार आहे, तर झिम्बाब्वे दौऱ्यात चांगली कामगिरी करणाऱ्या हरभजनला टी-२०त कायम राखण्यात आले. बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी निवड समितीच्या बैठकीनंतर आज वन-डे व टी-२० संघांची घोषणा केली. अनुभवी लेगस्पिनर अमित मिश्राचा दोन्ही संघांत समावेश आहे. श्रीलंका दौऱ्यात चमकदार कामगिरीचा लाभ मिळाला.
गुरकिरत व अरविंद यांचा अपवाद वगळता संघात आश्चर्यचकित करणाऱ्या अन्य दुसऱ्या नावाचा समावेश नाही. भारतातर्फे अलीकडच्या कालावधीत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर निवड समितीने विश्वास व्यक्त केला आहे. अष्टपैलू रवींद्र जडेजाला दोन्ही संघांत स्थान मिळालेले नाही, तर इशांत शर्मा व वरुण अॅरॉन यांच्या नावांवर चर्चा झाली नाही. झिम्बाब्वे दौऱ्यादरम्यान विश्रांती करणारे सीनियर खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, रवीचंद्रन आश्विन आणि सुरेश रैना यांना दोन्ही संघांत स्थान मिळाले.
३१ वर्षीय अरविंदने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे प्रतिनिधित्व करताना ५ सामन्यांत ८ बळी घेतले आहेत. गोलंदाजांच्या निवडबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘टी-२० विश्वकप स्पर्धेचा विचार करता गोलंदाजीमध्ये विविधता पाहिजे. स्थानिक, तिरंगी व ‘अ’ संघांच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना संधी देण्यास इच्छुक आहे. विश्वकप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या दुखापतीबाबत बोलताना पाटील म्हणाले, ‘शमी पुनर्वसन कार्यक्रमात सहभागी झालेला आहे. तो सोमवारी शिबिरात सहभागी होणार असून, त्यानंतर त्याच्याबाबत निर्णय घेता येईल.
तो लवकरच संघात सहभागी होईल, अशी आशा आहे. गुरकिरत निवडीचा हकदार होता.
पाटील यांनी सांगितले की, ‘मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी ईशांतची निवड झाली नाही; पण त्याच्या नावावर चर्चा झाली. वन-डे संघासाठी हरभजनच्या नावाची चर्चा झाली; पण केवळ १५ खेळाडूंची निवड करणे शक्य असते.’ (वृत्तसंस्था)
पहिल्या तीन वन-डे सामन्यांसाठी संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, आर. आश्विन, गुरकिरतसिंग मान, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा आणि उमेश यादव.
टी-२० संघ
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टिरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, सुरेश रैना, अजिंक्य रहाणे, अंबाती रायडू, स्टुअर्ट बिन्नी, आर. आश्विन, अक्षर पटेल, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा आणि एस. अरविंद.
अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, भुवनेश्वर कुमार आणि मोहीत शर्मा यांचा दोन्ही संघांत समावेश आहे. निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले की, संघाची निवड पुढील वर्षी होणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेचा विचार करीत करण्यात आलेली आहे. त्यामुळे धोनीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यावर चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट झाले.
धोनीची कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात येणार असल्याचे वृत्त फेटाळून लावले. पाटील म्हणाले, ‘आम्ही वन-डे संघाच्या कर्णधारपदावर कुठलीच चर्चा केली नाही. धोनीच्या नेतृत्वावर आम्ही समाधानी आहोत.’
आम्ही गुरकिरतच्या अष्टपैलू क्षमतेचा विचार केला. ‘अ’ संघातर्फे त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली.’ श्रीनाथ अरविंदला संघात स्थान देण्याचा निर्णय चकित करणारा आहे. २०११ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याला वन-डे संघात स्थान देण्यात आले होते. त्या वेळी त्याला एकही लढत खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
- संदीप पाटील
विराट कोहली व महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे ज्याप्रमाणे अनुक्रमे कसोटी व वन-डे संघांचे कर्णधारपद आहे त्याचप्रमाणे बोर्ड विविध प्रकारांसाठी वेगवेगळ्या प्रशिक्षकांची नियुक्ती करू शकते.
आॅस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका संघांचे कसोटी, वन-डे आणि टी-२० क्रिकेटसाठी वेगवेगळे कर्णधार आहेत.
-अनुराग ठाकूर