एक होता फेडरर... उद्धट, तापट आणि बेजबाबदार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 07:55 AM2022-09-18T07:55:27+5:302022-09-18T07:56:06+5:30

सोप्या भाषेत सांगायचे तर जणू आपला सचिन! सचिनने कमावले तेच, तसेच प्रेम आणि तोच आदर फेडररनेही कमावला

One was Rojer Federer... rude, passionate and irresponsible! | एक होता फेडरर... उद्धट, तापट आणि बेजबाबदार!

एक होता फेडरर... उद्धट, तापट आणि बेजबाबदार!

Next

रोहित नाईक, 

जर फेडरर या टेनिसविश्वाच्या अवलियाने आपल्या विक्रमी २४ वर्षांच्या कारकिर्दीला विराम दिला आणि अवघे क्रीडाविश्व हळहळले. सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम जेतेपद मिळवण्यामध्ये दुसरे स्थान, शंभराहून अधिक एटीपी जेतेपदे, एकेरीमध्ये एक हजारांहून अधिक विजय, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारा आदरणीय (आणि सर्वाधिक वयाचा) खेळाडू, अशा अनेक विक्रमी कामगिरींची नोंद करत फेडररने टेनिसविश्वात आपली वेगळी जागा निर्माण केली. 

सोप्या भाषेत सांगायचे तर जणू आपला सचिन! सचिनने कमावले तेच, तसेच प्रेम आणि तोच आदर फेडररनेही कमावला! सचिनने निवृत्ती घेतली तेव्हा संपूर्ण देश स्तब्ध झाला होता, १५ सप्टेंबरलाही भारतीय टेनिस चाहत्यांची अवस्था काही वेगळी नव्हती! यावेळी निवृत्ती फेडररची होती! गेली २० हून अधिक वर्षे भारतीयांना टेनिसची गोडी लागली ती मुख्यत: फेडररमुळेच. फेडररची खास ओळख आहे ती एक विनयशील, सज्जन सद्गृहस्थ अशी! विजयाचा उन्माद नाही, पराजयाचा संताप नाही आणि प्रतिस्पर्ध्याशी लढताना चिवटपणा असला, तरी त्याला व्यक्तिगत खुन्नसचे रूप कधीही नाही. राग व्यक्त न करणारा, विनाकारण आक्रमक न होणारा, अशी त्याची ओळख; पण एकेकाळी हाच फेडरर अत्यंत उद्धट आणि बेजबाबदार होता, हे आज कोणाला खरे वाटणार नाही.
आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबामध्ये ‘रॉजर’चा जन्म झाला. आई-वडिलांच्या प्रेमामुळे लाडावलेला रॉजर अक्षरशः पैसे उधळायचा. किशोरवयामध्येच त्याला टेनिसची गोडी लागली. तेव्हापासूनच त्याने जगातील सर्वोत्तम टेनिसपटू बनण्याचे लक्ष्य निर्धारित केले होते; पण त्याचे बेजबाबदारपणाचे वर्तन बघून लोक त्याला हसण्यावारी नेत. 

रॉजर अत्यंत तापट स्वभावाचा होता. छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडायचा. कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक स्पर्धांमध्ये गुण गमावल्यावर त्याने कोर्टवरच अनेकदा रॅकेट फेकली आहे, तोडली आहे. त्यामुळेच त्याच्या पालकांनाही रॉजरच्या भविष्याची चिंता होती. त्यांनी शक्य होईल ते सर्वकाही आपल्या लाडक्या लेकासाठी केले; पण रॉजरला त्याची पर्वा नव्हती. यादरम्यान एक गोष्ट चांगली घडत होती. रॉजर सर्वाधिक वेळ आपल्या प्रशिक्षकांसोबत घालवू लागला. त्याच्या प्रशिक्षकांनी रॉजरची गुणवत्ता बरोबर हेरली.
रॉजर त्याच्या स्वभावामुळे पूर्ण क्षमतेने खेळत नव्हता. ज्या स्पर्धा त्याने जिंकायला पाहिजे होत्या, त्यात तो सुरुवातीच्या फेरींमध्येच पराभूत होऊ लागला. त्यामुळे प्रशिक्षकाने सर्वांत आधी रॉजरला संयम बाळगण्यासह आनंदी राहण्याचे महत्त्व पटवले. 

रॉजरला आपली चूक कळली आणि त्याचा खेळ बहरत गेला. जेव्हा फेडररला आपला मार्ग योग्य दिशेने सुरू असल्याचे कळले, तेव्हाच एक दुर्दैवी घटना घडली. १ ऑगस्ट २००२ रोजी त्याच्या प्रशिक्षकाचा अपघाती मृत्यू झाला. हा धक्का रॉजरला पचण्यासारखा नव्हता. आता पुढचा मार्ग आपल्याला एकट्याने पूर्ण करायचा आहे, हा विचारच त्याला नैराश्यात ढकलणारा होता; पण त्याच्यासोबत कायम होते ते प्रशिक्षकाचे बोल आणि त्यांनी दिलेली शिकवण. 

रॉजरने आपल्या स्वभावात बरेच बदल केले. तो शांत झाला. आता जे काही करायचे ते आपल्या प्रशिक्षकासाठी हाच निश्चय त्याने केला. त्यामुळेच त्याने स्वत:ला बदलण्याचे ठरवले. अतिआक्रमकपणा कमी केला आणि २००३ साली पहिले ग्रॅण्डस्लॅम जिंकल्यानंतर त्याने काही महिन्यांनी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावत रॉजरने आपला शब्द खरा केला. यानंतर अशी कोणती स्पर्धा उरली नाही जी रॉजरने जिंकली नाही.
फेडररचे ‘ते’ प्रशिक्षक होते ऑस्ट्रेलियाचे पीटर कार्टर!

(लेखक वरिष्ठ उपसंपादक आहेत)
 

Web Title: One was Rojer Federer... rude, passionate and irresponsible!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस