व्यावसायिक बॉक्सर्सना आॅलिम्पिकची दारे खुली
By admin | Published: June 2, 2016 02:09 AM2016-06-02T02:09:26+5:302016-06-02T02:09:26+5:30
व्यावसायिक बॉक्सर्स आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बुधवारी हा निर्णय घेतला.
लुसाने : व्यावसायिक बॉक्सर्स आगामी रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतील. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने बुधवारी हा निर्णय घेतला. स्वित्झर्लंडच्या लुसाने शहरात झालेल्या बॉक्सिंग काँग्रेसमध्ये ८८ सदस्यांनी याच्या बाजूने मतदान केले. विरुद्ध एकही मत पडले नाही; पण चार सदस्य तटस्थ राहिले.
या निर्णयानंतरही दिग्गज बॉक्सर रिओमध्ये दिसण्याची शक्यता कमीच आहे. अनेक बॉक्सर पात्रता फेरीत खेळलेले नसल्याने त्यांना थेट प्रवेश मिळणार नाही. माजी हेविवेट चॅम्पियन ब्लादिमीर क्लिश्चको हा देखील पात्रता फेरी खेळला नव्हता. भारताचा स्टार विजेंदरसिंग याच्याकडे देखील पात्रता फेरी खेळण्याची संधी उपलब्ध नाही. माईक टायसन आणि लेनॉक्स लुईस यांनी हा निर्णय मूर्खपणा असल्याचे संबोधले, तर आमीर खान याने निर्णयाचे स्वागत केले. मिडलवेट गटात अव्वल स्थानावर असलेला विजेंदर मागच्या वर्षी व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये आला. तेव्हापासून तो अपराजित आहे. १६ जुलै रोजी त्याला दिल्लीत डब्ल्यूबीओ आशिया चषकासाठी लढत द्यायची आहे. अखेरची आॅलिम्पिक पात्रता स्पर्धा १६ जूनपासून अझरबैजान येथे होत आहे. त्यासाठी मागच्या महिन्यात चाचणी झाली तेव्हा विजेंदर स्पर्धक नव्हता. पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघदेखील आधीच निवडण्यात आला असल्याने विजेंदरची संधी हुकली आहे. (वृत्तसंस्था)