उद्घाटन सोहळ्यात संस्कृती आणि रंगांची उधळण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 03:29 AM2017-11-21T03:29:09+5:302017-11-21T03:29:16+5:30
भारताला प्रथमच मिळालेले विश्व बॉक्सिंगचे आयोजन अविस्मरणीय ठरविण्यासाठी दिमाखदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला.
भारताला प्रथमच मिळालेले विश्व बॉक्सिंगचे आयोजन अविस्मरणीय ठरविण्यासाठी दिमाखदार उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. आयोजन स्थळापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मोहंमद तय्यबुद्दीन हॉकी स्टेडियम हजारो स्थानिक आणि विदेशी नागरिकांच्या साक्षीने तब्बल दोन तास रंगलेल्या या सोहळ्यात आसामच्या सांस्कृतिक आणि संगीत परंपरेसह भारतीय संगीताची मेजवानी सादर करण्यात आली. सोबतीला बॉलिवूड तडका होता. प्रसिद्ध गायक शान आणि स्थानिक लोकप्रिय गायक शिमांतो शेखर यांनी एकाहून एक सरस गाणी गाऊन प्रेक्षकांना धमाल करायला भाग पाडले. जगभरातून आलेल्या खेळाडूंनीदेखील संगीत आणि नृत्याच्या तालावर थिरकत सोहळ्याचा आनंद लुटला.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी स्पर्धा सुरू झाल्याची घोषणा करताच टाळ्यांचा पाऊस पडला. या वेळी एआयबीए उपाध्यक्ष एडगर तानेर, भारतीय बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजयसिंग, बीएफआय उपाध्यक्ष हेमंत कलिता, स्पर्धेची ब्रँडदूत आणि पाच वेळेची विश्व चॅम्पियन बॉक्सर खासदार मेरी कोम यांच्यासोबत सोनोवाल यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री व्यासपीठावर होते. काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहणार नाही, असे आधी सांगणारी मेरी कोम हिची उपस्थिती मात्र अनेकांना सुखद धक्का देणारी होती. कार्यक्रमाच्या शेवटी तब्बल अर्धा तास नयनरम्य आतषबाजी करण्यात आली.