सर्वोत्तम कामगिरी करण्याची भारतीय खेळाडूंना संधी

By admin | Published: June 22, 2017 01:08 AM2017-06-22T01:08:01+5:302017-06-22T01:08:01+5:30

दिग्गज अ‍ॅथलिट पी.टी. उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज यांनी भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलैदरम्यान होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंना

Opportunities for Indian players to do their best | सर्वोत्तम कामगिरी करण्याची भारतीय खेळाडूंना संधी

सर्वोत्तम कामगिरी करण्याची भारतीय खेळाडूंना संधी

Next

नवी दिल्ली : दिग्गज अ‍ॅथलिट पी.टी. उषा आणि अंजू बॉबी जॉर्ज यांनी भुवनेश्वर येथे ६ ते ९ जुलैदरम्यान होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी असल्याचे सांगताना वर्षअखेर लंडनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारत आतापर्यंतचे सर्वात मोठे पथक पाठवू शकतो, अशी आशाही व्यक्त केली.
वुहान येथे गेल्या स्पर्धेपेक्षा चांगल्या कामगिरीचा शब्द भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेने दिला आहे, तर आशियाई चॅम्पियनशिपमध्ये १४ सुवर्णपदकांसह एकूण २३ पदके जिंकणाऱ्या उषाने तिसऱ्यांदा भारतीय भूमीवर होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनाने आपण रोमांचित झालो असल्याचे सांगितले.
भारताने २0१५ मध्ये वुहान येथे झालेल्या स्पर्धेत चार सुवर्ण पदकांसह १३ पदके जिंकली होती आणि ते तिसऱ्या स्थानावर होते. एएफआयचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी भारत तिसऱ्या स्थानी राहील; परंतु या वेळेस पदकांची संख्या जास्त असेल, असा विश्वास व्यक्त केला. सुमारीवाला म्हणाले, ‘वुहानमध्ये आम्ही १३ पदके जिंकली होती आणि आम्ही तिसऱ्या क्रमांकावर होता. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्यास विश्व चॅम्पियनशिपमध्ये थेट प्रवेश मिळेल आणि आमचे जास्तीत जास्त खेळाडू अव्वल स्थान मिळवतील अशी आशा आहे.’ भारताने अद्याप आपला संघ घोषित केला नाही; परंतु त्यांचे सर्वात मोठे पथक (१६८ अ‍ॅथलिट) या स्पर्धेत सहभागी होणार आहे. एकूण ४२ स्पर्धा आयोजित होणार असून, त्यात जास्तीत जास्त भारत तीन खेळाडू खेळवणार आहे. या स्पर्धेत एकूण ८१५ खेळाडू सहभागी होतील. (वृत्तसंस्था)

आशियाई स्पर्धेसाठी गौडाला द्यावी लागणार ट्रायल
भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने भारताचा अव्वल थाळीफेकपटू अ‍ॅथलिट विकास गौडा याला त्याला पुढील महिन्यात भुवनेश्वर येथे होणाऱ्या अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत आपल्या विजेतेपदाचा बचाव करण्याची इच्छा असेल, तर त्याला या आठवड्याअखेर ट्रायल द्यावी लागणार असल्याचे सांगितले आहे. चीनच्या वुहान येथे २0१५ मध्ये सुवर्णपदक जिंकणारा गौडा आणि ११0 मीटर अडथळा शर्यतीतील धावपटू सिद्धांत थिंगाल हे परदेशात स्थित असणारे भारतीय अ‍ॅथलिट आहेत. या दोघांनही २५ आणि २६ जूनला एनआयएस पतियाळा येथे ट्रायल देण्यास सांगण्यात आले आहे. ट्रायलमध्ये अपयशी ठरल्यास ते ६ ते ९ जुलैदरम्यान होणाऱ्या आशियाई स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत.

नवी दिल्ली (१९८९) आणि पुणे (२0१३) यानंतर भारतात तिसऱ्यांदा होत असलेल्या या स्पर्धेच्या आयोजनाने वास्तवत: मी रोमांचित आहे. भारतीय खेळाडूंना ही एक खूप चांगली संधी आहे आणि या वेळेस आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्यात आम्ही यशस्वी ठरू. भारत किती पदके जिंकेल हे मी सांगू शकत नाही; परंतु प्रथमच आमचे सर्वात मोठे पथक सहभागी होत आहे आणि ते आपल्या भूमीवर खेळतील. ही त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. उषाच्या मतास विश्व अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला एकमेव पदक जिंकून देणारी अंजू बॉबी जॉर्जनेदेखील सहमती दर्शवली.- पी. टी. उषा

या स्पर्धेचा विशेषत: ज्युनिअर खेळाडूंना मोठा फायदा मिळेल. आमचे ज्युनिअर अ‍ॅथलिट गेल्या काही वर्षांपासून प्रभावी कामगिरी करीत आहेत. आम्ही ज्युनिअर विश्व चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. या वेळेस भारताकडे यजमानपद आहे आणि आमचे खेळाडू जास्तीत जास्त सुवर्णपदक जिंकतील आणि आम्ही विश्व चॅम्पियनशिपसाठी सर्वात मोठे पथक पाठवण्यात यशस्वी ठरू, अशी आशा आहे.- अंजू बॉबी

पाकला निमंत्रण, व्हिसा देण्याचे काम सरकारचे : एएफआय
भारत सरकारने अद्याप खेळाडूंना व्हिसा दिलेला नसल्यामुळे पाकिस्तान भुवनेश्वर येथे ६ जुलैपासून सुरू होणाऱ्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होण्याविषयी निश्चित नाही. शेजारील राष्ट्र बांगलादेशचा संघ भुवनेश्वरला पोहोचला आहे, तर श्रीलंका, भूतान आणि मालदीव हे संघदेखील पुढील काही दिवसांत येथे पोहोचतील; परंतु पाकिस्तानविषयी भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेने (एएफआय) स्पष्टीकरण देताना त्यांना निमंत्रण दिले आहे; परंतु आता त्यावर निर्णय घेणे सरकारचे काम असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Opportunities for Indian players to do their best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.