विजयाची गुढी उभारण्याची संधी
By admin | Published: March 28, 2017 01:30 AM2017-03-28T01:30:42+5:302017-03-28T01:30:42+5:30
उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांनी टिच्चून मारा करून आॅस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावांत १३७ धावांत खुर्दा केला
धरमशाला : उमेश यादव, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्विन यांनी टिच्चून मारा करून आॅस्ट्रेलियाचा दुसऱ्या डावांत १३७ धावांत खुर्दा केला. तिघांच्या अप्रतिम कामगिरीच्या बळावर भारताने चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेरीस सामना जिंकण्याच्या आणि मालिका विजयाच्या दिशेने कूच केली. दरम्यान, विजयासाठी १०६ धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने दुसऱ्या डावात बिनबाद १९ अशी मजल गाठली. चार दिवसांच्या आत सामना जिंकण्यासाठी आणखी ८७ धावांची गरज असल्याने गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘विजयाची गुढी’ उभारण्याची मोठी संधी चालून आली आहे.
लोकेश राहुलने पॅट कमिन्सच्या पहिल्याच षटकात तीन चौकार ठोकून विजयाचे मनसुबे जाहीर केले. तो १३, तर मुरली विजय ६ धावांवर नाबाद आहेत. त्याआधी जडेजाने ६३ धावांत ४, आश्विनने २९ धावांत ३ आणि उमेश यादवने २९ धावांत ३ गडी बाद करून दुसऱ्या डावांत ५३.५ षटकांत आॅस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. ग्लेन मॅक्सवेल (४५) आणि पीटर हँड्सकोंब (१८), मॅथ्यू वेड (२५) यांच्या संयमी खेळीनंतरही पाहुण्यांना फार काळ तग धरणे कठीण झाले होते. चहापानापर्यंत ९२ धावांत ५ गडी गमावणाऱ्या पाहुण्या संघाचे उर्वरित ५ फलंदाज तिसऱ्या सत्रात पाठोपाठ बाद झाले.
त्याआधी जडेजाने ९५ चेंडूंत प्रत्येकी ४ चौकार आणि षटकारांसह ६३ धावांचे योगदान देऊन आघाडी मिळवून दिली. जडेजाचे हे कसोटीतील सातवे व मोसमातील सहावे अर्धशतक होते. जडेजा तज्ज्ञ फलंदाजाप्रमाणे खेळला. त्याने कमिन्सचे आखूड टप्प्याचे चेंडू शिताफीने टोलवले. जडेजा आणि साहा यांनी आजच्या खेळीत कसोटीतील एक हजार धावांचादेखील पल्ला गाठला. (वृत्तसंस्था)
धावफलक :
आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ३००. भारत पहिला डाव : ३३२. आॅस्ट्रेलिया दुसरा डाव : मॅट रेनशॉ झे. साहा गो. उमेश ८, डेव्हिड वॉर्नर झे. साहा गो. उमेश ६, स्टीव्ह स्मिथ त्रि. गो. भुवनेश्वर १७, पीटर हँड्सकोंब झे. रहाणे गो. आश्विन १८, ग्लेन मॅक्सवेल पायचित गो. आश्विन ४५, शॉन मार्श झे. पुजारा गो. जडेजा १, मॅथ्यू वेड नाबाद २५, पॅट कमिन्स झे. रहाणे गो. जडेजा २१, स्टीव्ह ओकिफी झे. पुजारा गो. जडेजा ०, नाथन लियोन झे. विजय गो. उमेश ०, जोश हेजलवूड पायचित गो. आश्विन ०, अवांतर : ५, एकूण : ५३.५ षटकांत सर्व बाद १३७ धावा. गडी बाद क्रम : १/१०, २/३१, ३/३१, ४/८७, ५/९२, ६/१०६, ७/१२१, ८/१२१, ९/१२२. गोलंदाजी : भुवनेश्वर ७-१-२७-१, उमेश यादव १०-३-२९-३, कुलदीप यादव ५-०२३-०, जडेजा १८-७-२४-३, आश्विन १३.५-४-२९-३.
भारत दुसरा डाव : लोकेश राहुल खेळत आहे १३, मुरली विजय खेळत आहे ६. एकूण : बिनबाद १९ धावा. गोलंदाजी : कमिन्स ३-१-१४-०, हेजलवूड २-०-५-०, ओकिफी १-१-०-०.
सर्व प्रकारांत चांगला खेळत असल्याचे समाधान : जडेजा
वन-डेसोबतच कसोटी क्रिकेटमध्ये चांगले योगदान देत असल्याचे समाधान असून यामुळे आत्मविश्वासदेखील उंचाविल्याचे मत भारतीय संघासाठी चौथ्या कसोटीत ‘हुकमी एक्का’ ठरलेला अष्टपैलू रवींद्र जडेजा याने व्यक्त केले.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध २५ बळी आणि दोन अर्धशतकांची नोंद केल्यानंतर तिसऱ्या दिवसाचा खेळ आटोपताच जडेजा म्हणाला, ‘‘वन-डेपाठोपाठकसोटीतही चांगली कामगिरी करीत असल्याचे समाधान लाभले. माझ्या आत्मविश्वासात भर पडली. दबावातही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरलो.
आज सकाळच्या सत्रात परिस्थिती कठीण होती. विकेटवर उसळी असल्याने १४० च्या वेगाने येणारे चेंडू अक्षरश: आदळत होते. कसोटी क्रिकेटमध्ये आव्हानात्मक परिस्थिती काय असते आणि जाणकार जे भाष्य करतात त्यात किती तथ्य असते, हे मला समजले आहे.’’
आजच्या खेळीदरम्यान सहकाऱ्यांनी केलेले कौतुक, तसेच नंतर माजी खेळाडूंनी दिलेली दाद माझ्यासाठी अधिक मोलाची असल्याचे मत मालिकावीर पुरस्कारांच्या दावेदारीत असलेल्या जडेजाने व्यक्त केले.
दडपणाबाबत वॉर्नरच सांगू शकतो : हिक
भारताविरुद्धच्या मालिकेत सहभागी होण्यापूर्वी वॉर्नरवर अधिक दडपण होते का, याचे उत्तर केवळ वॉर्नरच देऊ शकतो, असे आॅस्ट्रेलियाचे फलंदाजी प्रशिक्षक ग्रीम हिक यांनी सांगितले. वॉर्नरला ८ डावांमध्ये केवळ १९३ धावा करता आल्या.
हिक म्हणाले, ‘डेव्हिड या कामगिरीमुळे निराश झाला असेल. तो आक्रमक खेळाडू असून, आम्हाला त्याचे तेच रूप अधिक आवडते. त्यामुळे दडपणाबाबत तोच चांगले सांगू शकतो.’
हिक पुढे म्हणाले, ‘वॉर्नर आमच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. त्याला येथे कडवे आव्हान मिळाले. जडेजा व आश्विन यांनी त्याच्याविरुद्ध चांगला मारा केला. कसोटी क्रिकेटचे हेच सौंदर्य आहे. महान खेळाडू एकमेकांना आव्हान देत असतात.’
स्टीव्ह स्मिथ चांगली कामगिरी करीत असल्यामुळे आॅस्ट्रेलियन संघ त्याच्यावर अधिक अवलंबून असतो, अशी कबुली हिक
यांनी यावेळी दिली.
हिक म्हणाले, ‘आॅस्ट्रेलिया संघाचा कामगिरीवर विश्वास आहे. स्मिथ आपल्या यशासोबत दुसऱ्या खेळाडूंच्या यशामुळेही आनंदी होतो. दुसऱ्यांच्या अपयशामुळे तो निराश होतो.’
टर्निंग पॉर्इंट...
रवींद्र जडेजाने पहिल्या डावात अर्धशतक झळकावून पहिला डाव ३३२ पर्यंत खेचून भारताला ३२ धावांची आघाडी मिळवून दिली. रिद्धिमान साहासोबत (३१) त्याने सातव्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी केली.
निसटती आघाडी मिळाल्याने मनोबल उंचावलेल्या भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या चेंडूवर आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने खराब फटका मारण्याचा प्रयत्न करताच चेंडू बॅटला लागल्यानंतर आॅफ स्टम्प उडाला.
मॅक्सवेल बाद झाल्यानंतर वेड व जडेजामध्ये वाद
१आॅस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेड व भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा यांच्यादरम्यान चौथ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ग्लेन मॅक्सवेल बाद झाल्यानंतर वाद झाला.
२आॅस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील ३३व्या षटकादरम्यान ही घटना घडली. त्या वेळी मॅक्सवेलला दक्षिण आफ्रिकेचे पंच मराइस इरासमस यांनी पायचीत बाद दिले होते. मॅक्सवेलने ताबडतोब डीआरएसची मागणी केली. टीव्ही रिप्लेमध्ये साशंकता होती; पण अखेर पंचाचा निर्णय कायम ठेवण्यात आला. मॅक्सवेलने तंबूची वाट धरली होती; पण राग अनावर झालेल्या वेडने भारतीय खेळाडूंसोबत वाद घालण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन आश्विनने मध्यस्थी करून आॅस्ट्रेलियन यष्टिरक्षकाला थोपविले.
स्मिथने मुरली विजयला वापरले अपशब्द
मुरली विजयने जोश हेजलवूडचा झेल यशस्वीरीत्या घेण्याचा दावा केल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने या अपिलावर नाराजी व्यक्त करीत मुरली विजयला अपशब्द वापरले. तिसऱ्या पंचांनी नंतर त्याला नॉट आउट घोषित केले. तिसच्या पंचांच्या निर्णयानंतर स्मिथने मुरली विजयला अपशब्द वापरल्याचे त्याने ऐकले.
साहाने मोडला
धोनीचा हा विक्रम
वृद्धिमान साहाने भारताचा माजी कर्णधार एम.एस.धोनी याचा विक्रम मोडला आहे. चौथ्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात यष्टीरक्षण करताना साहाने विकेटच्या पाठीमागे एका मोसमात स्टपिंग आणि झेल घेण्याचा धोनीचा विक्रम मोडला आहे. साहाने कसोटी सामन्यात २०१६-१७ च्या मोसमात २६ जणांना माघारी पाठवत धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.
माजी भारतीय कर्णधार आणि विकेटकिपर धोनीने २०१२-१३ च्या मोसमात २४ जणांना तंबूत पाठवलं होतं. या यादीत सय्यद किरमानी यांचा अव्वल क्रमांक लागतो. त्यांनी १९७९-८० या मोसमात ३५ फलंदाजांना माघारी पाठवलं होतं.
मी संघात जबाबदार खेळाडूंपैकी एक असल्याने इतरांच्या तोंडून ऐकताना बरे वाटते. कठोर मेहनतीचे हेच फळ आहे. अन्य पुरस्कारांच्या तुलनेत संघाच्या विजयात सूत्रधाराची भूमिका वठवायला मिळणे हा माझ्यासाठी मोठा पुरस्कार ठरतो.
- रवींद्र जडेजा