विविध संयोजन तपासण्याची संधी
By admin | Published: June 23, 2017 12:46 AM2017-06-23T00:46:37+5:302017-06-23T00:46:37+5:30
कागदावर उभय संघांबाबत विचार केला तर निश्चितच भारतीय संघ यजमान संघाच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसून येते.
सौरव गांगुली लिहितात...
पोर्ट आॅफ स्पेनमध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत नव्याने सुरुवात करेल. कागदावर उभय संघांबाबत विचार केला तर निश्चितच भारतीय संघ यजमान संघाच्या तुलनेत बलाढ्य असल्याचे दिसून येते. भारतीय संघ व्यवस्थापन या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेचा उपयोग २०१९ च्या विश्वकप स्पर्धेवर लक्ष केंद्रित करताना युवा व विविध संयोजनाचा वापर करण्यासाठी प्रयत्नशील असेल. अशा प्रकारची मालिका ऋषभ पंतसारख्या युवा खेळाडूला जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्यासाठी पूर्णपणे ‘लाँचिंग पॅड’ ठरू शकते.
अजिंक्य रहाणेला चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान राखीव खेळाडूंमध्ये बसावे लागले, पण रोहित शर्माला या दौऱ्यात विश्रांती देण्यात आल्यानंतर रहाणेला वन-डे क्रिकेटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची संधी आहे. रहाणे कशा प्रकारची खेळी करतो, याबाबत उत्सुकता आहे. रहाणेमध्ये प्रतिभा आहे. वन-डे क्रिकेटमध्ये तो यशस्वीही ठरला आहे. संघात ‘आत-बाहेर’ होण्यासाठी त्याला कुणी दोषी ठरवणार नाही.
मोहम्मद शमीही असाच एक खेळाडू आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी संघात त्याची निवड करण्यात आली होती. शमी सराव सामन्यात खेळला, पण त्यानंतर त्याला संधी मिळाली नाही. शमी सामना जिंकून देणारा गोलंदाज आहे. त्याचा योग्यपणे वापर करण्याची गरज आहे. त्याला मालिकेदरम्यान दुखापतीची समस्या भेडसावू शकते, पण त्याला या मालिकेत नैसर्गिक खेळी करण्याचे स्वातंत्र्य द्यायला हवे.
विंडीज संघाबाबत बोलायचे झाल्यास विश्व क्रिकेटने त्यांना पुनरागमनासाठी सहकार्य करायला हवे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाक संघाच्या यशापासून विंडीज संघाने बोध घ्यायला हवा. ‘पाकिस्तान जर करू शकतो तर आम्हीपण हे करू शकतो’ या सिद्धांतावर त्यांनी वाटचाल करायला हवी. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या संघाने आता चमकदार कामगिरी करायला हवी. कॅरेबियन संघाचा इतिहास गौरवशाली आहे. विंडीजने क्रिकेटला अनेक महान खेळाडू दिले आहे. वर्षभरापूर्वी वेस्ट इंडिजचा अंडर-१९ संघ आणि पुरुष व महिला संघही टी-२० मध्ये अव्वल स्थानावर होते. वर्षभरापूर्वी विंडीजने दोनदा टी-२० लढतींमध्ये भारतीय संघाचा पराभव केला होता. त्यामुळे विंडीजमध्ये प्रतिभांची उणीव नाही. त्यांना केवळ अनुभवी व युवा खेळाडूंदरम्यान ताळमेळ साधण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना भारताच्या आव्हानाला सामोरे जाण्यास मदत मिळेल. (गेमप्लॅन)