पश्चिम रेल्वेला विजेतेपद राखण्याची संधी
By admin | Published: October 20, 2016 04:17 AM2016-10-20T04:17:14+5:302016-10-20T04:17:14+5:30
केंद्रीय सचिवालय संघाचा ५-३ असा पराभव करुन मुंबई हॉकी संघटना आयोजित सुपर डिव्हिजन स्पर्धेतील विजेतेपद राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले
मुंबई : गतविजेत्या पश्चिम रेल्वेने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत केंद्रीय सचिवालय संघाचा ५-३ असा पराभव करुन मुंबई हॉकी संघटना आयोजित सुपर डिव्हिजन स्पर्धेतील विजेतेपद राखण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. त्याचवेळी विजेतेपदासाठी पश्चिम रेल्वेपुढे गुणतालिकेत अव्वल असलेल्या भारतीय नौदलाचे तगडे आव्हान असेल.
चर्चगेट येथील हॉकी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सुरुवातीला गोल करुन प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणण्याच्या रणनितीने पश्चिम रेल्वे मैदानात उतरली. रेल्वेच्या मनजिंदर सिंगने सामन्याच्या २४ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडले. या गोलमधून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच सचिवालय संघाला रेल्वेच्या मनप्रीत सिंगने २६ व्या मिनिटाला गोल करुन आणखी एक धक्का दिला. यामुळे रेल्वे संघाने सामन्यात २-० अशी भक्कम आघाडी घेतली.
रेल्वे संघाने आक्रमकतेवर भर देत केंद्रीय संघाच्या अडचणी वाढवल्या. त्यातच जयकरणच्या ३४ व्या मिनिटाच्या गोलने रेल्वे संघाने सामन्यात ३-० अशी आघाडी भक्कम केली. अखेर केंद्रीय सचिवालय संघाच्या हसन बाषाने रेल्वेच्या बचावफळीला भेदत ३६ व्या मिनिटाला गोल केला. हसनच्या गोलमुळे केंद्रीय संघावर आलेली मरगळ दुर झाली. मात्र रेल्वेच्या मलक सिंगने ४७ व्या आणि ५६ व्या मिनिटाला गोल झळकावत सामन्यावर संघाला ५-१ अशी पकड मिळवून दिली.
उत्तरार्धात केंद्रीय संघाने पिछाडी कमी करण्यासाठी अधिक आक्रमकतेने खेळण्यास सुरुवात केली. यावेळी रेल्वेने मात्र बचावावर अधिक लक्ष केंद्रीत केले. केंद्रीय संघाच्या फिलेक्स बा व एस. शिवामणी यांनी तुफान आक्रमण करताना अनुक्रमे ६५ व्या व ६६ व्या मिनिटाला गोल झळकावले. यावेळी सचिवालय संघ अनपेक्षित धक्का देणार असे चित्र होते. परंतु, रेल्वेने कोणताही धोका न पत्करताना ५-३ अशी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)