‘आॅरेंज आर्मी’ला रोखले

By admin | Published: April 13, 2017 04:14 AM2017-04-13T04:14:23+5:302017-04-13T04:14:23+5:30

आयपीएलच्या दहाव्या सत्रात सलग दोन विजयांसह दणक्यात सुरुवात केलेल्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादची विजयी घोडदौड अखेर मुंबई इंडियन्सने रोखली.

The 'Orange Army' has been stopped | ‘आॅरेंज आर्मी’ला रोखले

‘आॅरेंज आर्मी’ला रोखले

Next

- रोहित नाईक,  मुंबई

आयपीएलच्या दहाव्या सत्रात सलग दोन विजयांसह दणक्यात सुरुवात केलेल्या गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादची विजयी घोडदौड अखेर मुंबई इंडियन्सने रोखली. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर फलंदाजांच्या चमकदार खेळीच्या जोरावर मुंबईने सलग दुसरा विजय मिळवताना हैदराबादचा ४ विकेट्सने पाडाव केला. यासह मुंबईने तीन सामन्यांतून ४ गुणांची कमाई करताना गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात हैदराबादला १५७ धावांवर रोखल्यानंतर मुंबईने विजयी लक्ष्य १८.४ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. पुन्हा एकदा नितिश राणाने उपयुक्त खेळी करताना ३६ चेंडूत ३ चौकार व २ षटकार ठोकताना ४५ धावांची खेळी केली. सलामीवीर पार्थिव पटेल (२४ चेंडूत ३९) आणि कृणाल पांड्या (२० चेंडूत ३७) यांनीही मोक्याच्यावेळी केलेली फटकेबाजी मुंबईसाठी मोलाची ठरली. त्याचवेळी, पुन्हा एकदा कर्णधार रोहित शर्मा अपयशी ठरला. सलग तिसऱ्या सामन्यात तो स्वस्तात बाद झाल्याने मुंबईच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय जोस बटलर, केरॉन पोलार्ड यांनाही या सामन्यात छाप पाडता आली नाही. मात्र, राणाने सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेताना संघाला विजयी केले. भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेत मुंबईला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी, सावध पवित्र्यासह सुरुवात केलेल्या हैदराबादने जम बसल्यानंतर समाधानकाराक मजल मारण्यात यश मिळवले. शिखर धवन (४८) - डेव्हिड वॉर्नर (४९) या सलामी जोडीव्यतिरिक्त इतर कोणताही प्रमुख फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला नाही. त्याचवेळी, हे दोघेही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद झाले. बेन कटिंग्जने अखेरच्या काही षटकात ४ चौकार मारल्याने हैदराबादला दिडशेचा टप्पा ओलांडता आला. जसप्रीत बुमराहने मोक्याच्यावेळी हैदराबादचे ३ फलंदाज बाद करुन त्यांना मर्यादेत रोखण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्याला यावेळी सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच, अनुभवी हरभजन सिंगनेही २ बळी घेत चमक दाखवली.

लक्षवेधी राशिद...
अफगाणिस्तानचा राशिद खान पुन्हा एकदा लक्षवेधी ठरला. त्याने हैदराबादकडून जबरदस्त गोलंदाजी करताना ४ षटकात केवळ १९ धावा देत मुंबईचा कर्णधार रोहितच्या रुपाने महत्त्वाचा बळीही मिळवला. मात्र, इतर गोलंदाजांकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने त्याची झुंज अपयशी ठरली.

पंचांचे दुर्लक्ष आणि वॉर्नरचा फायदा
पहिल्या डावातील पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकात म्हणजे सहाव्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डेव्हीड वॉर्नरने बुमराहला चौकार ठोकला. यानंतर नियमाप्रमाणे पुढील षटकातील पहिला चेंडू शिखर धवनने खेळणे अपेक्षित होते. परंतु, सातव्या षटकातील पहिला चेंडू देखील वॉर्नरनेच खेळला आणि त्यावर एक धाव घेतली. विशेष म्हणजे, पंचांच्या लक्षात ही बाब आली तेव्हा खूप उशीर झाला होता.

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १५७ धावा (डेव्हीड वॉर्नर ४९, शिखर धवन ४८, बेन कटिंग्ज २०; जसप्रीत बुमराह ३/२४, हरभजन सिंग २/२३) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १८.४ षटकात ६ बाद १५९ धावा (नितीश राणा ४५, पार्थिव पटेल ३९, कृणाल पांड्या ३७; भुवनेश्वर कुमार ३/२१, राशिद खान १/१९)

Web Title: The 'Orange Army' has been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.