‘आॅरेंज आर्मी’ची विजयी हॅट्ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2015 12:45 AM2015-05-12T00:45:35+5:302015-05-12T00:45:35+5:30

कर्णधार डेव्हिड वॉर्नरची धुवाधार ८१ धावांची खेळी, त्यानंतर हेन्रिक्सचे ३ बळी यांच्या जोरावर सनरायझर्र्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा अवघ्या ५ धावांनी पराभव केला.

The Orange Army's Victory Hatrick | ‘आॅरेंज आर्मी’ची विजयी हॅट्ट्रिक

‘आॅरेंज आर्मी’ची विजयी हॅट्ट्रिक

Next

हैदराबाद : कर्णधार डेव्हिड वॉर्नरची धुवाधार ८१ धावांची खेळी, त्यानंतर हेन्रिक्सचे ३ बळी यांच्या जोरावर सनरायझर्र्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबचा अवघ्या ५ धावांनी पराभव केला. पंजाबकडून ८९ धावांची नाबाद खेळी करणाऱ्या मिलरचा संघर्ष मात्र व्यर्थ ठरला. ‘आॅरेंज आर्मी’चा हा सलग तिसरा विजय ठरला. या विजयानंतर त्यांनी गुणतालिकेत पहिल्या ४ संघांत स्थान पटकावले.
यजमान सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबपुढे १८६ धावांचे आव्हान उभारले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना किंग्ज इलेव्हन पंजाबने ७ बाद १८० धावसंख्येपर्यंत मजल मारली. त्यांच्या मुरली विजय (२४) आणि मनन वोहरा (२०) या सलामी जोडीने आक्रमक सुरुवात केली होती. त्यांनी अवघ्या ४.५ षटकांत ४२ धावांची भागीदारी केली. या दोघांनाही विपुल शर्माने बाद करीत पंजाबला मोठा धक्का दिला. त्यानंतर वृद्धिमान साहा (५), ग्लेन मॅक्सवेल (११) आणि कर्णधार जॉर्ज बेली (६) हे झटपट बाद झाले. त्यामुळे पंजाबचा संघ १२.३ षटकांत ५ बाद ८१ अशा संकटात सापडला. गुरुकिरतसिंग (३) आणि अक्षर पटेल (१५) हेसुद्धा झटपट धावा करण्याच्या नादात बाद झाले. एका बाजूने तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या डेव्हिड मिलरला दुसऱ्या बाजून साथ मिळाली नाही. अखेर एकाकी झुंज देत त्याने संघाला विजयाची आशा दाखवली होती. त्याने ४४ चेंडूंत ९ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने नाबाद ८९ धावा केल्या.
त्याआधी, वॉर्नरने ५१ चेंडूंत ६ चौकार आणि ५ षटकार ठोकून ८१ धावा फटकावल्या. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वॉर्नरचा हा निर्णय यशस्वी ठरला. त्याने स्वत: शिखर धवनसोबत पहिल्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. यामध्ये वॉर्नरच्या २८, तर धवनच्या २२ धावांचा समावेश होता. धवन-वॉर्नर ही जोडी चांगली जमली होती. सातव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मॅक्सवेलने धवनला यष्टिचीत केले. धवनने १८ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीने २४ धावा केल्या. त्यानंतर हेन्रिक्सने वॉर्नरला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. हेन्रिक्सने २४ चेंडूंत २८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ४ चौकारांचा समावेश आहे. गुरुकिरतसिंंगच्या चेंडूवर तो अनुरितसिंगकरवी झेलबाद झाला. त्यानंतर आलेल्या इयान मोर्गनने वॉर्नरला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी मोर्गनला हेन्ड्रीक्सने वोहराकरवी झेलबाद केले. मोर्गनने ७ चेंडूंत २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने आक्रमक १७ धावा केल्या. त्या वेळी हैदराबाद संघ १५.२ षटकांत ३ बाद १४० अशा स्थितीत होता. अवघ्या ४ षटकांचा खेळ शिल्लक राहिल्याने वॉर्नरने अधिक आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, हेन्ड्रीक्सच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात तो गुरुकिरतसिंगकडे झेल देऊन बाद झाला. नव्याने आलेला नमन ओझा केवळ २ धावा काढून धावबाद झाला. त्यानंतर अंतिम षटकांमध्ये लोकेश राहुल (नाबाद १७) आणि कर्ण शर्मा (नाबाद ११) यांनी शानदार योगदान देऊन संघाला ५ बाद १८५ धावसंख्येपर्यंत आणले. गुरुकिरतसिंग आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
(वृत्तसंस्था)

Web Title: The Orange Army's Victory Hatrick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.