आॅलिम्पिकमधील खेळांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्रीडा स्पर्धा पुस्तिकेतील ३६ क्रीडा प्रकाराला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 06:46 PM2017-08-21T18:46:28+5:302017-08-21T18:46:58+5:30
आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने...
अमरावती : आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच एकविध संघटनेच्या तांत्रिक सहकार्याने सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विविध शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या क्रीडा स्पर्धा पुस्तिकेतील ७९ स्पर्धांपैकी ३६ स्पर्धांना स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने कळविल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दिली.
या स्पर्धांना ब्रेक
आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या पत्रान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने एकूण ७९ खेळांपैकी लंगडी, आप्टे-डू-आखाडा, तायक्वांदो, म्युझिकल चेअर, सायकल पोलो, हाप किडो बॉक्सिंग, ज्युडो मार्शल आर्ट, रोलर हॉकी, कुराश, चॉकबॉल, रग्बी, स्पीडवॉल, पेन्टाक्यू, फिल्ड आर्चरी, फुटबॉल टेनिस, जम्परोप, टेंग सुडो, कनोइंग व कायाकींग, कुडो, पिकलबॉल, पॉवर लिफ्टिंग, रोप स्किपींग, सेलिंग, सेपॅक टॅकरा, सिलंबम, सॉफ्ट टेनिस, टेक्निक्वाईट, टेनिस बॉल क्रिकेट, टेनिस हॉलीबॉल, ट्रेडिशनल रेसलिंग, वुडबॉल, थांगता मार्शल आर्ट, रस्सीखेच, जित कुने दो, फ्लोअर बॉल, डान्स स्पोर्ट, मॉन्टेस बॉल क्रिकेट, लगोरी, मिनी गोल्फ या खेळांना पुढील आदेशांपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.
शालेय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत २० आॅगस्ट रोजी पार पडलेल्या सभेत आॅलिम्पिक स्पर्धेत अंतर्भाव असलेल्या ४२ क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणे करून या खेळाकडे अधिक लक्ष पुरवून आगामी आलिम्पिक स्पर्धेत पदक मिळू शकेल, हा यामागील उद्देश आहे.
- गणेश जाधव,
जिल्हा क्रीडा अधिकारी, अमरावती