रणजी सामन्यांचे तटस्थ स्थळांवर आयोजन फसले

By admin | Published: January 18, 2017 05:05 AM2017-01-18T05:05:14+5:302017-01-18T05:05:14+5:30

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला.

Organized for Ranji matches at neutral venues | रणजी सामन्यांचे तटस्थ स्थळांवर आयोजन फसले

रणजी सामन्यांचे तटस्थ स्थळांवर आयोजन फसले

Next

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा तटस्थ स्थळांवर रणजी सामन्यांचे आयोजन करण्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला. काही आघाडीच्या खेळाडूंच्या मते, यजमान संघटनांची उदासीनता आणि खराब योजनेमुळे ही व्यवस्था निष्क्रिय ठरली.
बीसीसीआयने स्पर्धेतील रंजकता वाढविण्यासाठी या योजनेचा वापर केला. स्थानिक संघाला गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये आणि खेळाडूंना वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी ही योजना राबविण्यात आली होती.
स्थानिक क्रिकेटमधील अनुभवी खेळाडू रजत भाटिया म्हणाला, ‘ही योजना चांगली होती, पण लागू करण्याची पद्धत चुकीची होती. अनेक यजमान संघटनांनी दुसऱ्या संघांचे सामने आयोजित करण्यास स्वारस्य दाखविले नाही. सुविधा चांगल्या नव्हत्या. चांगल्या खेळपट्ट्या, सरावासाठी पुरेशे चेंडू आणि चांगले भोजन याची वानवा होती. यामध्ये सुधारणा करता आली असती.’
दिल्लीचा हा क्रिकेटपटू तीन राज्यांतर्फे खेळलेला आहे. सध्या तो राजस्थानसोबत जुळलेला आहे. कौटुंबिक कारणामुळे यंदाच्या मोसमात केवळ चार सामने खेळणाऱ्या भाटियाने या व्यवस्थेवर कडाडून टीका केली.
भाटिया पुढे म्हणाला, ‘आसामविरुद्ध विशाखापट्टणममध्ये आम्ही खेळलेल्या लढतीचे उदाहरण देता येईल. खेळपट्टी प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी अनुकूल नव्हती. त्यामुळे सामना तीन दिवसांत संपला आणि एका आंतरराष्ट्रीय लढतीच्या दोन आठवड्यांपूर्वी हे घडले. ज्यावेळी आम्ही मैदानावरील कर्मचाऱ्याला खेळपट्टीच्या दर्जाबाबत विचारणा केली तर त्याच्याकडे उत्तर देण्यासाठी काहीच नव्हते.’
त्या लढतीत वेगवान गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले. पंकज सिंगने ९ बळी घेतले आणि राजस्थानने तीन दिवसांमध्ये एक डाव व ८ धावांनी विजय मिळवला.
सामन्यांचा कार्यक्रम खेळाडूंसाठी आणखी एक डोकेदुखी ठरली. कारण फारच कमी वेळेत देशाच्या दूरच्या भागात खेळासाठी जावे लागत होते.
भारतीय फिरकीपटू व रणजी स्पर्धेत गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करणारा अक्षर पटेल म्हणाला, ‘कार्यक्रम मोठी अडचण होती. सामन्यांमध्ये केवळ तीन दिवसांचे अंतर होते आणि पोहचणे सोपे नसलेल्या स्थळावर आम्हाला पोहचावे लागत होते. त्यामुळे आम्हाला बराच वेळ बसमध्ये घालवावा लागला.’
सामन्याकडे प्रेक्षकांनीही पाठ फिरवली. त्यामुळे अक्षर पटेलला तटस्थ स्थळांची कल्पना पटली नाही.
अक्षर म्हणाला, ‘प्रेक्षक लाभणार नसलेल्या स्थळांवर सामन्यांचे आयोजन करण्याला काहीच अर्थ नसतो. ज्यावेळी आम्ही गृहमैदानावर खेळतो त्यात काही प्रमाणात प्रेक्षक येतात. आगामी मोसमात पुन्हा एकदा गृहमैदान व बाहेर अशा प्रकारे सामन्यांचे आयोजन होईल, अशी आशा आहे.’
तामिळनाडूचा सलामीवीर अभिनव मुकुंदने खेळपट्ट्यांच्या दर्जाबाबत टीका केली. त्याने स्पर्धेदरम्यान म्हटले होते की, ‘मला ही कल्पना आवडली नाही. गृहमैदानावर खेळणे महत्त्वाचे ठरते.’ (वृत्तसंस्था)
>स्थानिक संघांना गृहमैदानावर खेळण्याचा लाभ मिळू नये, यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती. कारण यापूर्वी सामने दोन दिवसांमध्ये संपत होते. यावेळी सामने तटस्थ स्थळांवर खेळविण्यात आले, पण गुणवत्तेमध्ये कुठलीच सुधारणा घडली नाही. - रजत भाटिया

Web Title: Organized for Ranji matches at neutral venues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.