सुवर्णपदक हेच आमचे लक्ष्य - स्क्वॅशपटू महेश मानगावकर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 07:19 AM2018-08-31T07:19:02+5:302018-08-31T07:20:42+5:30

२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही स्क्वॅशचे सांघिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता.

Our goal - the gold medal - squash player Mahesh Mangaonkar | सुवर्णपदक हेच आमचे लक्ष्य - स्क्वॅशपटू महेश मानगावकर

सुवर्णपदक हेच आमचे लक्ष्य - स्क्वॅशपटू महेश मानगावकर

Next

अभिजित देशमुख
थेट जकार्ता येथून


२०१४च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही स्क्वॅशचे सांघिक सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला होता. आम्ही यंदाही उपांत्य फेरी गाठली आणि पदक निश्चित झाले असले, तरी आमचे लक्ष्य सुवर्णपदकच आहे, असे भारतीय पुरुष संघाचा स्क्वॅशपटू महेश मानगावकर याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महेशने पुढे म्हटले, ‘मी, सौरव घोषाल, हरिंदरपाल गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतसुद्धा होतो; त्यामुळे आमचा संघ मजबूत आणि अनुभवी आहे. रमीत टंडनसुद्धा उत्तम खेळत आहे. आम्हाला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याची परिस्थिती माहीत आहे. सिंगापूर, कतार, इंडोनेशिया, थायलंड यासारख्या संघांचा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली; त्यामुळे प्रदर्शन योग्य मार्गावर आहे.’
यंदाची स्पर्धा खडतर असल्याचे सांगताना महेश म्हणाला, ‘मागच्या आशियाई क्रीडा स्पर्धांपेक्षा या वेळी स्पर्धा कठीण आहे. हाँगकाँगला या स्पर्धेमध्ये शीर्षस्थान लाभले आहे. त्यांनी आपला सर्वाेत्तम संघ पाठविला आहे. त्यांचे दोन खेळाडू जागतिक क्रमवारीत २०मध्ये आहेत. त्यामुळे आव्हान हाँगकाँगचे आहे. मलेशियाचे खेळाडू चांगल्या बहरात आहेत.’

त्याचप्रमाणे, ‘आम्ही वर्षभर वैयक्तिक स्पर्धा खेळतो; पण आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय संघासोबत खेळण्याची खूप उत्सुकता असते. यावेळी प्रत्येक खेळाडूवर थोडा दबाव नक्कीच असतो, कारण आपल्या संघाचे सदस्य आपल्यावर अवलंबून असतात. त्याचवेळी संघसहकारी प्रोत्साहन देऊन आत्मविश्वाही वाढवतात. मी मूळचा मुंबईचा असलो, तरी प्रशिक्षण नेदरलँड्समध्ये करतो. आशियाई स्पर्धेसाठी खूप चांगली तयारी झाली आहे. स्क्वॅशमध्ये गती आणि प्रतिक्षेप सर्वांत महत्त्वाचे आहे. फिटनेसवर खूप मेहनत घेतली आहे. माझे वैयक्तिक प्रशिक्षक सेबास्टियन वैनीक यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले आहे,’ असेही महेशने सांगितले.

भारताच्या पुरुष स्क्वाश संघामध्ये महेश माणगावकर मोलाचे योगदान दिले आहे. भारताचा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू असलेला महेश मूळचा मुंबईचा असून तो नेदरलँड्सला सराव करतो.

‘मलेशियाला हरवणे असंभव नाही’
मलेशिया जरी फॉर्ममध्ये असला, तरी उपांत्य फेरीत त्याला हरवण्यास आम्ही सक्षम आहोत. शेवटच्या साखळी सामन्यात हाँगकाँगविरुद्ध आम्ही थोडे कमी पडलो. हाँगकाँगच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात मला गती कायम राखता आली नाही. तरी, मी एक सेट जिंकला; पण सामना जिंकू शकले नाही, याची खंत आहे. सुयांना कुरुविलाने आपल्या करिअरचा सर्वाेत्तम खेळ करून १-१ अशी बरोबरी साधली. जोशना चिनाप्पाचा आज दिवस नव्हता. ती सरळ सेटमध्ये पराभूत झाली. असे सहजासहजी कधी होत नाही. उपांत्य फेरीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी करू, असे स्क्वॅशपटू दीपिका पालिकल- कार्तिक हिने सांगितले.

चांगला खेळ झाला नाही
आम्ही चांगले खेळलो नाही. दुसरा गोल आम्ही स्वीकारायला नको होता. पेनल्टीमध्ये कुठलाही संघ जिंकू शकतो. मलेशियाने सामना जिंकला नाही; आम्ही हा सामना गमावला. आम्ही खूप चुका केल्या. आम्ही साधी हॉकी खेळलो नाही आणि आमच्याकडे बॉलचा ताबा खूप होता; परंतु आपल्या खेळाडूंना त्याचा फायदा उचलता आला नाही, असे भारतीय हॉकी संघाचे मार्गदर्शक हरेंद्रसिंगने सांगितले.

६५ पदके मिळवू : रणधीरसिंग
भारताची सर्वोत्तम कामगिरी २०१०मध्ये ६५ पदकांची होती. आतापर्यंतच्या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरून नक्कीच आपण ६५चा आकडा पार करू, असे माजी आॅलिम्पियन व आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक समितीचे सदस्य रणधीरसिंग यांनी ‘लोकमत’ला सांगितले. बºयाच खेळांत आपले पदक नक्की झाले आहे. पहिल्यांदाच या स्पर्धेत समाविष्ट झालेले खेळ वुशू, कुराश, ब्रिज यांमध्ये आपल्या खेळाडूंनी पदके जिंकल्यामुळे आपल्या पदकतालिकेत खूप फरक पडला आहे. अविश्वसनीय कामगिरी या आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंनी बजावली आहे. तरुण खेळाडू उत्तम कामगिरी करीत आहेत. त्यामुळे भविष्यात भारतीय क्रीडाक्षेत्राला नक्कीच चांगले दिवस येतील, असा विश्वास मला वाटतो.
 

Web Title: Our goal - the gold medal - squash player Mahesh Mangaonkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.