‘ओव्हरवेट’ विनेश फोगट पात्रता स्पर्धेतून बाद
By admin | Published: April 24, 2016 04:01 AM2016-04-24T04:01:00+5:302016-04-24T04:01:00+5:30
भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगट हिचे निर्धारित वजनगटापेक्षा अधिक वजन भरल्यामुळे विश्व आॅलिम्पिक पात्रता कुस्तीतून तिला बाद ठरविण्यात आले.
उलनबटेर(मंगोलिया) : भारताची अनुभवी महिला मल्ल विनेश फोगट हिचे निर्धारित वजनगटापेक्षा अधिक वजन भरल्यामुळे विश्व आॅलिम्पिक पात्रता कुस्तीतून तिला बाद ठरविण्यात आले. अन्य महिला मल्लांनादेखील पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने कुणालाही आॅलिम्पिकचे तिकीट मिळू शकले नाही.
४८ किलो वजन गटात आखाड्यात उतरलेल्या विनेशचे वजन अन्य मल्लांच्या तुलनेत ४०० ग्रॅम अधिक होते. त्यामुळे तिला स्पर्धेतून बाद ठरविण्यात आले. ४८ किलो वजन गटात पात्रता मिळविण्यासाठी आता इस्तंबूल येथे ६ ते ८ मे या कालावधीत होणाऱ्या अखेरच्या स्पर्धेत भारताला संधी असेल; पण भारतीय मल्लाला कोटा मिळण्याची शक्यता कमीच आहे. विनेश आणि तिच्या कोचला घडलेल्या प्रकाराबद्दल तंबी देण्यात आली आहे. विनेश आणि कोचमुळे भारताला रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविण्यात अपयश आले. तिचा पहिलाच गुन्हा असल्यामुळे तंबी देऊन सोडण्यात आले आहे. विनेशनेदेखील आणखी एक संधी दिल्यास आॅलिम्पिक कोटा मिळविण्यात कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही, या शब्दांत कुस्ती महासंघाला विनंती केली आहे. इस्तंबूल येथील पात्रता स्पर्धेत २०० टक्के कामगिरी करण्याचे आश्वासन विनेशने महासंघाला दिले आहे. तेथे ती अपयशी ठरल्यास भारतात परतताच तिला नोटीस बाजवण्यात येईल, असे हा अधिकारी म्हणाला.
भारतीय महिला कुस्ती पथकातील विनेश फोगट, बबिता फोगट आणि गीता फोगट या सध्या सोफियात सराव करीत आहेत. दरम्यान बबिता (५३ किलो), गीता (५८ किलो), अनिता (६३ किलो), नवज्योत कौर (६९ किलो), ज्योती (७५ किलो) या पदकाच्या दावेदारीतून बाद झाल्या आहेत. बबिता, गीता व ज्योती रेपेचेज फेरीत पराभूत झाल्या. अनिता आणि नवज्योत सलामीलाच चीत झाल्या. बबिताने कोरियाची शिन्हाई ली हिला ५-० ने पराभूत केले; पण पुढच्या कुस्तीत ती अमेरिकेची हेलन लुईस हिच्याकडून ०-१० ने पराभूत झाली.
इस्तंबूल येथे पुढील महिन्यात होणाऱ्या पात्रता सामन्यासाठी ४८ किलो गटात दुसऱ्या महिला मल्लाला पाठविण्याचा महासंघ विचार करीत आहे काय, असे विचारताच हा अधिकारी म्हणाला,‘विनेश आणि दुसऱ्या मुलीच्या कामगिरीत मोठा फरक आहे. अखेरच्या क्षणी अन्य कुणाला व्हिसा मिळणेही कठीण आहे. याशिवाय विनेश आॅलिम्पिक मल्लांच्या कोअर ग्रुपमध्ये आहे.