पी. कश्यपची उप-उपांत्यपूर्व फेरीत धडक
By admin | Published: April 20, 2017 02:52 AM2017-04-20T02:52:13+5:302017-04-20T02:52:13+5:30
राष्ट्रकुल चॅम्पियन आणि दुखापती दूर करून पुनरागमन केलेल्या अनुभवी शटलर पारुपल्ली कश्यप
चांग्झू : राष्ट्रकुल चॅम्पियन आणि दुखापती दूर करून पुनरागमन केलेल्या अनुभवी शटलर पारुपल्ली कश्यप याने चीन मास्टर्स ग्रां. प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, हर्षिल दानी यानेही चमकदार आगेकूच करताना उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
जानेवारीमध्ये झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीगदरम्यान खांदा दुखावल्यानंतर पुनरागमन केलेल्या कश्यपने शानदार बाजी मारताना थायलंडच्या सुपान्यु अविहिंगसानोनचे आव्हान २१-१६, २१-१७ असे संपुष्टात आणले. ४६ मिनिटांमध्ये बाजी मारताना कश्यपने आक्रमक पवित्रा घेत स्मॅशचा प्रभावीपणे वापर करताना नेट्सजवळ चांगले नियंत्रण राखले. यानंतर, कश्यपचा सामना तिसऱ्या मानांकित चीनच्या कियाओ बिनविरुद्ध होईल.
दुसरीकडे युवा खेळाडू हर्षिलने आपली छाप पाडली. त्याने चीनच्या यान रुनजीविरुद्ध जबरदस्त खेळ करताना २१-१६, २२-२० असे वर्चस्व राखले. पुढील फेरीत त्याच्यापुढे काहीसे कडवे आव्हान असून चीनच्या सुपर फेइशियांगविरुद्ध तो दोन हात करेल. दरम्यान, महिला एकेरीमध्ये भारताच्या साई उत्तेजिता राव चुक्का आणि श्री कृष्णा प्रिया कुदारावल यांना सुरुवातीला आपला गाशा गुंडाळावा लागला. साईला चीनच्या ली वेनमेईविरुद्ध झुंजार खेळ केल्यानंतरही ४-२१, २१-१३, १२-२१ असा पराभव पत्करावा लागला. तसेच, श्री कृष्णाला चीनच्याच ली युनने २१-१८, २१-११ असा धक्का दिला. (वृत्तसंस्था)