पी. कश्यप, एच. प्रणय दुस-या फेरीत
By admin | Published: April 9, 2015 01:09 AM2015-04-09T01:09:28+5:302015-04-10T08:39:26+5:30
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि युवा खेळाडू एचएस प्रणय यांनी बुधवारी येथे आपापल्या लढती जिंकताना सिंगापूर ओपन
सिंगापूर : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन पारुपल्ली कश्यप आणि युवा खेळाडू एचएस प्रणय यांनी बुधवारी येथे आपापल्या लढती जिंकताना सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीची दुसरी फेरी गाठली.
यंदा जानेवारीमध्ये सय्यद मोदी ग्रांप्री गोल्डचे विजेतेपद पटकावणाऱ्या कश्यपने कोरियाच्या ली ह्यू इल याचा २१-११, २१-१३ असा पराभव केला. पुढील फेरीत तो चौथ्या मानांकित सोन वॉन याच्याशी दोन हात करेल.
अन्य लढतीत इंडोनेशिया मास्टर्स चॅम्पियन प्रणयने हाँगकाँगच्या वोंग विंग की विन्सेंट याला २१-२५, २१-१७ असे नमवले.
ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील माजी चॅम्पियन जोडीनेदेखील दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित करताना कोरियाच्या आह रा आणि यू हेई वोन यांचा २१-१२, २१-१६ असा महिला दुहेरीत पराभव केला.
तथापि, आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि पीसी तुलसी यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत पराभवाची चव चाखावी लागली.
गुरुसाईदत्तने पहिला गेम जिंकल्यानंतरही त्याला सोन वॉन हो याच्याविरुद्ध २१-१६, १२-२१, १५-२१ असा पराभव पत्करावा लागला. तुलसीला डेन्मार्कच्या लाईन जार्सफेल्टने अवघ्या ३५ मिनिटांत २१-१६, २१-१४ असे पराभूत केले.
तरुण कोना आणि एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. या भारतीय जोडीला को सुंग ह्यून आणि किम हा ना या कोरियन पाचव्या मानांकित जोडीने एकतर्फी सामन्यात
२१-१५, २१-१७ असे सहजरीत्या नमवले. (वृत्तसंस्था)