पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत यांच्यावर भारताची मदार
By admin | Published: March 1, 2016 03:03 AM2016-03-01T03:03:14+5:302016-03-01T03:03:14+5:30
दुखापतीमुळे माघार घेतलेली फुलराणी सायना नेहवाल हिच्या अनुपस्थितीत पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत हे आजपासून सुरू होणाऱ्या जर्मन ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत
मुलहेम अॅन डेर रुहर (जर्मनी) : दुखापतीमुळे माघार घेतलेली फुलराणी सायना नेहवाल हिच्या अनुपस्थितीत पी. व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत हे आजपासून सुरू होणाऱ्या जर्मन ग्रां.प्री. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेत पात्रता फेरीतून भारतीय आव्हानाला सुरुवात करतील.
गेल्या वर्षी पायाला झालेल्या दुखापतीमुळे जागतिक क्रमवारीतील द्वितीय खेळाडू सायनाने यंदा कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली नाही. शिवाय, सध्या ती प्रतिष्ठेच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेपूर्वी तंदुरुस्त होण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच सायनाच्या अनुपस्थितीत भारतीय महिला एकेरीचे नेतृत्व सांभाळण्याची जबाबदारी सिंधूवर आहे.
या वर्षी मलेशिया मास्टर्स स्पर्धेचे शानदार विजेतेपद पटकावल्यानंतर सिंधूचा खेळ अचानक खालावला. यादरम्यान दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) सिंधूला आपल्याच देशाच्या ऋत्विका शिवानी गड्डेविरुद्ध अनपेक्षित पराभव पत्करावा लागला. यानंतर झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतही सिंधूला जपानच्या नोजोमी ओकुहारा आणि कोरियाच्या जी ह्यून सुंग यांच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. याचबरोबर, सय्यद मोदी ग्रां.प्री. गोल्ड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच थायलंडच्या निचाओन जिंदापोलने नमविल्याने सिंधूला स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळेच जर्मन ओपन सिंधूसाठी आव्हानात्मक असेल.