पी. व्ही. सिंधूने संपवला जेतेपदाचा दुष्काळ; सय्यद मोदी बॅडमिंटन , पुरुषांत लक्ष्य सेन अजिंक्य; त्रिसा-गायत्रीचा दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 07:22 AM2024-12-02T07:22:22+5:302024-12-02T07:23:02+5:30
पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, महिला दुहेरीत त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी शानदार विजयासह जेतेपद पटकावले.
लखनौ : स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने दोन वर्षे आणि चार महिन्यांनी आंतरराष्ट्रीय विजेतेपदाचा दुष्काळ संपवताना रविवारी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरले. तर पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना विजेतेपद पटकावले. दुसरीकडे, महिला दुहेरीत त्रिसा जॉली-गायत्री गोपीचंद यांनी शानदार विजयासह जेतेपद पटकावले.
सिंधूने वू लुओ यू हिला सरळ दोन गेममध्ये २१-१४, २१-१६ असे नमवले. यासह सिंधूने एकूण तिसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. याआधी २०१७ आणि २०२२ साली सिंधूने या स्पर्धेत जेतेपद पटकावले होते. त्याचप्रमाणे, सिंधूने याआधी २०२२ मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेच्या रुपाने अखेरचे जेतेपद पटकावले होते. यावर्षी तिला मलेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
पुरुष एकेरीत लक्ष्य सेन याने शानदार कामगिरी करताना सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेह याला २१-६, २१-७ असे पराभूत करत विजेतेपद साकारले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाच्या प्लेऑफमध्ये झालेल्या निराशाजनक पराभवानंतर लक्ष्यचे विजेतेपद दिलासा देणारे आहे. नव्या सत्रात त्याचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल.
दुसरीकडे, महिला दुहेरीत त्रिसा-गायत्री यांनी जबरदस्त खेळ करताना बाओ ली जिंग-ली कियान या चिनी जोडीचा केवळ ४० मिनिटांमध्ये २१-१८, २१-११ असा धुव्वा उडवला. हे विजेतेपद भारतासाठी ऐतिहासिकही ठरले. कारण, या स्पर्धेत जेतेपद पटकावणारी त्रिसा-गायत्री यांची जोडी पहिला भारतीय महिला जोडी ठरली. याआधी, २०२२ मध्ये त्रिसा-गायत्री यांना या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
विजेतेपदामुळे निश्चितपणे माझा आत्मविश्वास वाढणार आहे. २९ वर्षांची असल्याने माझ्याकडे खूप मोठा अनुभव आहे. त्यामुळे निश्चितपणे पुढील काही वर्षे खेळणार आहे. लाॅस एंजिलिस ऑलिम्पिकला खूप वेळ आहे. त्यामुळे तंदुरुस्त राहणे हेच माझे प्रमुख लक्ष्य आहे.
पुरुष-मिश्र दुहेरीत उपविजेतेपद
पृथ्वी कृष्णमूर्ती रॉय आणि साई प्रतीक या पुरुष जोडीसह तनिषा क्रास्टो-ध्रुव कपिला या मिश्र जोडीला आपापल्या गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पृथ्वी-साई यांना ७१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत चीनच्या हुआंग डी-लियू याँग यांच्याविरुद्ध १४-२१, २१-१९, १७-२१ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत तनीष-ध्रुव यांचा डेचापोल पुआवारानुक्रोह-सुपिसारा पाएवसम्प्रान या थायलंडच्या जोडीविरुद्ध २१-१८, १४-२१, ८-२१ असा पराभव झाला.