पी. व्ही. सिंधू, लक्ष्य बाद फेरीत; श्रीकांत पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2021 08:42 AM2021-12-03T08:42:38+5:302021-12-03T08:43:30+5:30
P. V. Sindhu: दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन यांनी गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन टूर फायनल्स स्पर्धेची बाद फेरी गाठली. किदाम्बी श्रीकांत मात्र दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला.
बाली : दोन वेळेची ऑलिम्पिक पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू आणि युवा खेळाडू लक्ष्य सेन यांनी गुरुवारी बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन टूर फायनल्स स्पर्धेची बाद फेरी गाठली. किदाम्बी श्रीकांत मात्र दुसऱ्या सामन्यात पराभूत झाला. २०१८ ला ही स्पर्धा जिंकणारी २६ वर्षांच्या सिंधूने जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानावर असलेली जर्मनीची यवोनी ली हिचा अ गटात दुसऱ्या सामन्यात सरळ गेममध्ये ३१ मिनिटात २१-१०, २१-१३ ने पराभव केला.
सिंधूला आता अखेरच्या साखळी सामन्यात थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग हिच्याविरुद्ध खेळायचे आहे. अ गटात जपानचा केंटो मोमोटो आणि डेन्मार्कचा रासमुस गेम्के हे जखमांमुळे माघारल्यानंतर, उपांत्य फेरी गाठणारा लक्ष्य सेन ऑलिम्पिक चॅम्पियन व्हिक्टर एक्सेलसेन याच्याकडून पुढच्या साखळी सामन्यात १५-२१, १४-२१ ने पराभूत झाला. एक्सेलसेन विरुद्ध पराभवानंतर अल्मोडाचा २० वर्षांचा लक्ष्य दुसऱ्या स्थानावर आहे.
१४ वा मानांकित किदाम्बी श्रीकांत हा देखील ब गटात दुसऱ्या सामन्यात तीन वेळेचा विश्वविजेता थायलंडचा कुंलावुत वितिदसर्न याच्याविरुद्ध सरळ गेममध्ये १८-२१, ७-२१ ने पराभूत झाला. महिला दुहेरीतही अश्विनी पोनप्पा-एन. सिक्की रेड्डी यांना सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. चिराग शेट्टीच्या सोबतीने खेळणारा सात्त्विक साईराज याला गुडघ्याचे दुखणे उमळल्यानंतर पुरुष दुहेरीतून या जोडीने माघारीचा निर्णय घेतला.