मुंबईच्या मुदितची ऐतिहासिक कामगिरी, ‘एनसीटीटीए’ विजेता पहिला भारतीय ठरला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 01:18 PM2023-06-17T13:18:29+5:302023-06-17T13:19:46+5:30
भारताचे कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब- मुदित दानी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: युवा टेबल टेनिसपटू मुदित दानी याने भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी करताना अमेरिकेतील नॅशनल कॉलेजिएट टेबल टेनिस असोसिएशनच्या (एनसीटीटीए) वतीने देण्यात येणारा वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूचा पुरस्कार पटकावला. विशेष म्हणजे हा पुरस्कार पटकावणारा मुदित पहिला भारतीय ठरला आहे. २०२२-२३ वर्षातील सर्वोत्तम कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
अमेरिका टेबल टेनिस संघटनेशी संलग्न असलेल्या एनसीटीटीच्या वतीने प्रत्येक मोसमाच्या अखेरीस अमेरिका आणि कॅनेडाच्या विद्यापीठांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या पुरुष खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. न्यूयॉर्क विद्यापीठातील स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या मुदितने यंदा दोन सुवर्णपदके जिंकली. या जोरावर त्याने आपल्या संघाला एनसीटीटीए राष्ट्रीय जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका निभावली.
मुदितने २०१९ मध्ये यूएस ओपन अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार खेळ करताना पहिले आयटीटीएफ पदक जिंकले होते, तसेच गेल्यावर्षी त्याने डब्ल्यूटीटी स्पर्धेत दुहेरी गटात उपांत्य फेरी गाठली होती. ‘एनसीटीटी वर्षातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू पुरस्कार पटकावल्याचा आनंद आहे. हा पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरल्याचा विशेष आनंद आहे. भारताचे कोणत्याही स्तरावर प्रतिनिधित्व करणे अभिमानाची बाब आहे,’ अशी प्रतिक्रिया मुदितने दिली.