विश्वविक्रमाच्या बरोबरीपासून पेस वंचित

By admin | Published: September 21, 2015 11:49 PM2015-09-21T23:49:06+5:302015-09-21T23:49:06+5:30

सर्वांत अनुभवी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस चेक प्रजासत्ताकाविरुद्ध विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत दुहेरीच्या सामन्यात पराभूत होताच विश्वविक्रमाशी बरोबरी साधण्यापासूनही वंचित राहिला

Paes deprived of world record | विश्वविक्रमाच्या बरोबरीपासून पेस वंचित

विश्वविक्रमाच्या बरोबरीपासून पेस वंचित

Next

नवी दिल्ली : सर्वांत अनुभवी भारतीय टेनिसपटू लिएंडर पेस चेक प्रजासत्ताकाविरुद्ध विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीत दुहेरीच्या सामन्यात पराभूत होताच विश्वविक्रमाशी बरोबरी साधण्यापासूनही वंचित राहिला.
लिएंडर पेस आणि रोहन बोपण्णा या अनुभवी जोडीला राडेक स्टेपनेक- अ‍ॅडम पाब्लासेक यांच्याकडून ५-७, २-६, २-८ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने ही लढत १-३ अशी गमावली. यामुळे २०१६ च्या डेव्हिस चषकात भारताला आता आशिया-ओसेनिया झोनच्या ग्रुप- १ मध्ये खेळावे लागणार आहे. पेस या सामन्यात जिंकला असता तर इटलीचा निकोला पिएत्रांगेलो याच्या डेव्हिस चषकात ४२ दुहेरी सामने जिंकण्याच्या विक्रमाशी त्याला बरोबरी साधता आली असती. पेसने डेव्हिस चषकाच्या ५२ लढतींमध्ये ८९ सामने जिंकले असून, ३३ सामन्यांत त्याला पराभव पत्करावा लागला होता. एकेरीत त्याचे ४८ विजय आणि २२ पराभव, तर दुहेरीत ४१ विजय आणि ११ पराभव आहेत.
१७ ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाचा मानकरी असलेल्या पेसने दुहेरीचा सामना जिंकला असता तर पिएत्रांगेलोच्या ४२ विजयाशी त्याची बरोबरी झाली असती. ४२ वर्षांच्या पेसला पुढील वर्षी भारतीय डेव्हिस चषक संघात स्थान देण्यात येईल का, हे सांगणे कठीण आहे. भारतीय संघाचा कर्णधार आनंद अमृतराज याने दुहेरीतील पराभवानंतर पेस- बोपण्णा यांची चांगलीच कानउघाडणी केली होती. आम्ही ही लढत दुहेरीचा सामना हरताच गमावली होती, असे अमृतराज यांनी शनिवारी म्हटले होते. पेस-बोपण्णा या अनुभवी जोडीकडून फार अपेक्षा होत्या; पण त्यांनी घोर निराशा केली. सामन्यात त्यांनी कुठलाही संघर्ष केला नाही. आम्ही सामना गमविणार, असे मनातही आले नसल्याचे अमृतराज यांचे मत होते.
संघात साकेत मिनेनी आणि रामकुमार रामनाथन यांच्यासारखे युवा खेळाडू असल्याचे मत नोंदवीत अमृतराज यांनी पुढील वर्षी दुहेरीत परिवर्तन करण्याचे संकेतही देऊन टाकले होते.
डेव्हिस चषक इतिहासात कारकिर्दीत सर्वाधिक विजय मिळविण्यात पेस हा जगात चौथ्या स्थानावर आहे. त्याच्यापुढे स्पेनचा मॅन्युअल संताना (९२ विजय), रोमानियाचा इली नस्तासे (१०९) आणि इटलीचा पिएत्रांगेली (१२० विजय) यांचा समावेश आहे. पेस यंदा न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत खेळला नव्हता. चेकविरुद्ध तो संघात परतला; पण त्याने जी दारुण कामगिरी केली, त्यामुळे ४२ वर्षांच्या पेसचे डेव्हिस चषक खेळण्यावर देखील प्रश्नचिन्ह लागले आहे.(वृत्तसंस्था)

Web Title: Paes deprived of world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.