पेस-हिंगीस चॅम्पियन

By Admin | Published: September 13, 2015 04:19 AM2015-09-13T04:19:51+5:302015-09-13T04:19:51+5:30

अनुभवी लिएंडर पेसने स्वित्झर्लंडची ‘लकी गर्ल’ मार्टिना हिंगीससोबत अमेरिकन ओपन टेनिसमधील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

Paes-Hingis Champion | पेस-हिंगीस चॅम्पियन

पेस-हिंगीस चॅम्पियन

googlenewsNext

न्यूयॉर्क : अनुभवी लिएंडर पेसने स्वित्झर्लंडची ‘लकी गर्ल’ मार्टिना हिंगीससोबत अमेरिकन ओपन टेनिसमधील मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. ओपन युगमधील पेसच्या नावे सर्वाधिक मिश्र दुहेरीच्या जेतेपदांची नोंद झाली आहे.
भारत-स्विस चौथ्या मानांकित जोडीने बेथानी माटेक सॅन्ड्स आणि सॅम क्वेरी या अमेरिकेच्या बिगरमानांकित जोडीचा काल रात्री अंतिम लढतीत ६-४, ३-६, १०-७ ने पराभव केला. यंदाच्या मोसमात या जोडीचे हे तिसरे ग्रॅण्डस्लॅम आहे. पेसच्या नावे मिश्र दुहेरीची नऊ ग्रॅण्डस्लॅम झाली आहेत. त्याने आपला माजी जोडीदार महेश भूपती याला मागे टाकले.
भूपतीच्या नावे मिश्र प्रकारात आठ जेतेपदांची नोंद आहे. महान मार्टिना नवरातीलोवा हिच्या दहा जेतेपदाच्ंया तुलनेत पेस केवळ एका जेतेपदाने मागे आहे. दहापैकी दोन जेतीपद नवरातीलोवाने पेससोबत खेळून जिंकली, हे विशेष. या जोडीने २००३मध्ये आॅस्ट्रेलिया ओपन आणि विम्बल्डनचे जेतेपद पटकावले होते.
यंदा आॅस्ट्रेलिया आणि विम्बल्डनचे आधीच जेतेपद पटकविणाऱ्या पेसने हिंगीससोबत अमेरिकन ओपन जिंकून वर्षभरात तीन स्पर्धा जिंकण्याचा १९६९ नंतर प्रथमच विक्रम केला.
हिंगीसने पहिले
मिश्र जेतेपद २००६मध्ये आॅस्ट्रेलियन ओपनच्या रूपात भूपतीच्या सोबतीने
जिंकले होते. हिंगीस महिला दुहेरीतही सानिया मिर्झासोबत जेतेपदाच्या दावेदारीत कायम आहे.
पेस-मार्टिनाने पहिल्याच सेटमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडूंची सर्व्हिस मोडीत काढून २-१ अशी आघाडी मिळविली. नंतर ५-४ या स्कोअरवर पेसने सर्व्हिस राखून सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये एकमेव ब्रेक निर्णायक ठरला. या सेटमध्ये प्रतिस्पर्धी जोडीने बाजी मारून लढत १-१ ने बरोबरीत आणली होती. सुपर टायब्रेकरमध्ये पेस-हिंगीसच्या धारदार फटक्यांपुढे बेथानी-क्वेरी यांची डाळ न शिजल्याने त्यांना सेट आणि सामनाही गमवावा लागला.(वृत्तसंस्था)

माझ्यात लक्ष्य गाठण्याचे धैर्य
‘कुठलेही लक्ष्य गाठण्यासाठी आपल्यात क्षमता आणि हिंमत
असायला हवी...’ माझी सहकारी हिंगीसचे हे हे उद्गार
आहेत. तिचे उद्गार मी आत्मसात केले. त्यानुसार माझ्यात लक्ष्यप्राप्तीसाठी धैर्य आले आहे. खेळाचे तंत्र आणि प्रतिभा या गुणांसोबतच लक्ष्य गाठण्यासाठी जी हिंमत लागते, ती माझ्यात आहेच. आयुष्यात दृढ संकल्पाशिवाय काही साध्य करता येत नाही, हेच खरे. मार्टिनाकडून अशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.
- लिएंडर पेस

यूएस ओपनचे मिश्र दुहेरी जेतेपद पटकावल्याबद्दल पेस-हिंगीस यांचे अभिनंदन. आपण ऐतिहासिक कामगिरी केली आहे. देशाचा सन्मान आणि विजयी पताका अशीच उंचावत
ठेवा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!’’
- प्रणव मुखर्जी, राष्ट्रपती

पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खेळ केला. लिएंडर आणि मार्टिना जेतेपदाबद्दल अभिनंदन! आम्ही फार आनंदी आहोत.
आपल्या खेळाद्वारे भारताची मान टेनिस जगतात उंचावलीगेली, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान वाटतो.’’
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

लिएंडर पेस आणि मार्टिना हिंगीस यांचे त्रिवार अभिनंदन! दोघांनी इतिहास रचला. भारतीय क्रीडाक्षेत्राचे वैभव वाढविण्याची धुरा आपल्या खांद्यावर आहे, याचे भान राखून एकापाठोपाठ एक जेतीपदे शिरपेचात रोवल्याबद्दल
भारतीयांना अभिमान वाटतो.’’
- सर्वानंद सोनोवाल,
क्रीडामंत्री

Web Title: Paes-Hingis Champion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.