पेसला विश्वविक्रमाची संधी

By admin | Published: February 3, 2017 05:06 AM2017-02-03T05:06:35+5:302017-02-03T05:06:35+5:30

तब्बल ४३ वर्षांनी डेव्हिस चषक टेनिस लढतीचे यजमानपद भूषवीत असलेल्या पुणे शहराला या स्पर्धेच्या इतिहासातील एका दुर्मिळ विश्वविक्रमाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी

Paesa's chance of world record | पेसला विश्वविक्रमाची संधी

पेसला विश्वविक्रमाची संधी

Next

पुणे : तब्बल ४३ वर्षांनी डेव्हिस चषक टेनिस लढतीचे यजमानपद भूषवीत असलेल्या पुणे शहराला या स्पर्धेच्या इतिहासातील एका दुर्मिळ विश्वविक्रमाचा साक्षीदार होण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात होत असलेल्या टेनिस स्टेडियममध्ये यजमान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील डेव्हिस चषकाची ‘दंगल’ शुक्रवारपासून रंगेल. या दंगलीचे अर्थातच मुख्य आकर्षण असेल सदाबहार लिएंडर पेस! भारतीय टेनिस विश्वातील हा लिजंड डेव्हिस चषकात दुहेरीच्या सर्वाधिक लढती जिंकण्याच्या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. शनिवारी (दि. ४) होणारी दुहेरीची लढत जिंकल्यास या विजिगीषू वृत्तीच्या या खेळाडूच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जाईल.
आशिया-ओशनिया गटात होत असलेली उभय खेळाडूंतील ही लढत बहुधा पेसच्या डेव्हिस चषक कारकिर्दीतील अंतिम लढत आहे. शनिवारची दुहेरी लढत जिंकल्यास या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक ४३ लढती जिंकणारा खेळाडू म्हणून पेसची नोंद होईल. या लढतीसाठी अंतिम क्षणी पेसचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. साकेत मायनेनी दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही; त्यामुळे पेसला त्याचा लंडन आॅलिम्पिकमधील साथीदार विष्णुवर्धन याच्यासह खेळावे लागेल. पेस-विष्णुवर्धन जोडीची लढत शनिवारी आर्टेम सीटाक-मायकेल व्हीनस यांच्याविरुद्ध होणार आहे.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत गुरुवारी लढतींचा ड्रॉ काढण्यात आला. या वेळी डेव्हिस कप स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष आणि प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, आंतरराष्ट्रीय पंच अँड्री कॉरनिलोव्ह, डेव्हिस चषक लढतीचे संयोजन सचिव प्रशांत सुतार, एमएसएलटीइचे मानद सचिव व स्पर्धेचे संचालक सुंदर अय्यर, भारत संघाचे कर्णधार आनंद अमृतराज, लिएंडर पेस, युकी भांबरी, विष्णू वर्धन, रामकुमार रामनाथन, झिशान अली (प्रशिक्षक) आणि न्यूझीलंड संघाचे कर्णधार अलिस्टर हंट, मायकेल व्हीनस, फिन टिअर्नी, जोस स्टॅथम, आर्टेम सिटॅक उपस्थित होते. राहुल क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. सुरुवातीला दोन्ही संघांतील खेळाडूंचे फेटा बांधून व औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांची मिरवणूक काढण्यात आली.
जागतिक क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे मानांकन तसेच होम ग्राऊंड या गोष्टी बघता यजमानांचे पारडे जड आहे. यापूर्वी उभय संघांत झालेल्या डेव्हिस चषक लढतींमध्ये भारताचे ५-३ असे वर्चस्व राखलेले आहे. विशेष म्हणजे, १९७८नंतर भारत या स्पर्धेत न्यूझीलंडकडून पराभूत झालेला नाही. असे असले तरी न्यूझीलंड संघाला सहजपणे घेणार नसल्याचे अमृतराज यांनी स्पष्ट केले. २०१५मध्ये आशिया-ओशेनिया गटातील उपांत्य लढतीत न्यूझीलंडने भारताला घाम फोडला होता. ही लढत जिंकण्यासाठी भारतीय खेळाडूंना सर्वस्व पणाला लावावे लागले होते. त्या लढतीत १-२ने माघारल्यानंतर परतीच्या एकेरी लढती जिंकून भारताने सरशी साधली होती. त्या लढतीत पेस खेळला नव्हता. २०१२मध्ये चंडीगड येथे झालेल्या लढतीत भारताने ५-०ने न्यूझीलंडचा धुव्वा उडविला होता. त्याही वेळी पेस संघात नव्हता. २००२, २००३ व २००४ या तिन्ही वर्षी मात्र भारताच्या विजयात पेसने निर्णायक भूमिका बजावली होती. त्या वेळी पेस एकेरी तसेच दुहेरीत महेश भूपतीसह खेळला होता.(क्रीडा प्रतिनिधी)

‘४३’चा योग जुळणार?
पुण्यात तब्बल ४३ वर्षांनंतर डेव्हिस चषकाची लढत होत आहे. भारतीय टेनिसमधील सर्वाधिक यशस्वी खेळाडू असलेल्या पेसचे वयदेखील ४३ आहे. शनिवारचा सामना जिंकल्यास या स्पर्धेच्या इतिहासातील पेसचा तो दुहेरीतील ४३वा विजय ठरेल. हा योग जुळणार काय, याबाबत उत्सुकता आहे.

युकी-फिन यांच्यात रंगणार सलामी
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या ‘ड्रॉ’नुसार युकी भांबरी आणि न्यूझीलंडचा अव्वल खेळाडू फिन टिअर्नी यांच्यात शुक्रवारी दुपारी ३ वाजता सलामी सामना होत आहे. जागतिक क्रमवारीत युकी ३६८व्या, तर टिअर्नी ४१४व्या स्थानी आहे. यानंतर रामकुमार रामनाथन विरुद्ध जोस स्टॅथम यांच्यात दुसरी एकेरीची लढत होईल. रामनाथन आणि स्टॅथम यांच्या जागतिक क्रमवारीत दुपटीपेक्षा जास्त फरक आहे. रामनाथन २०६व्या, तर स्टॅथम ४१७व्या स्थानी आहे.

- खरे तर दुहेरीत पेस आणि रोहन बोपन्ना ही जोडी खेळणे अपेक्षित होते. तसे का झाले नाही, याबाबत वेगवेगळी चर्चा आहे. पेस आणि बोपन्ना यांच्यातील वादाची किनार या घटनेला आहे. बोपन्ना हा सध्या भारताचा दुहेरीतील अव्वल खेळाडू आहे. या प्रकरणाबाबत नेमकी माहिती देण्यास भारताचे न खेळणारे कर्णधार आनंद अमृतराज यांनीही असमर्थता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘नेमके काय झाले, याबाबत मला काहीही माहीत नाही. बोपन्नासोबत माझे बोलणे झाले नाही. त्याची इतरांशी चर्चा झाल्यानंतर विष्णुवर्धनला पेसचा सहकारी म्हणून निवडण्यात आले.’’
- बोपन्नासोबत मी बोलू इच्छित होतो; मात्र तसे करण्यापासून मला रोखण्यात आले, असे पेसने सांगितले. फोन करण्यास रोखणारी व्यक्ती कोण, हे सांगण्यास मात्र पेसने नकार दिला.

शिक्षणक्षेत्रातील योगदानामुळे पुण्याला ‘आॅक्सफर्ड आॅफ दि ईस्ट’ म्हटले जाते. आता यापुढे हे शहर महाराष्ट्राची स्पोर्ट्स कॅपिटल म्हणून उदयास येईल. २५ वर्षे पेसने भारतीयांच्या टेनिसबद्दलच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. तो भारताचा रॉजर फेडरर आहे.
- सी. विद्यासागर राव,
राज्यपाल

मलाच नाही तर संघातील सर्वच खेळाडूंना तिरंग्यासाठी खेळायला आवडते. आम्हा सर्वांसाठी ती अभिमानाची बाब असते. शनिवारच्या लढतीत सर्वोत्तम खेळ करण्याचा माझा प्रयत्न असेल. माझा विक्रम देशासाठी महत्त्वपूर्ण असेल, ही गोष्ट माझ्या लेखी सर्वांत मोठी आहे.
- लिएंडर पेस

अशा रंगणार लढती...
शुक्रवार - एकेरी
युकी भांबरी वि. फिन टिअर्नी
रामकुमार रामनाथन वि. जोस स्टॅथम

शुक्रवार -  दुहेरी
लिएंडर पेस-विष्णू वर्धन वि. आर्टेम सिटॅक-मायकेल व्हीनस

रविवार - एकेरी
रामकुमार रामनाथन वि. फिन टिअर्नी
युकी भांबरी वि. जोस स्टॅथम

Web Title: Paesa's chance of world record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.