टेबल टेनिस : महाराष्ट्रच्या पृथाची नजर सुवर्णपदकाकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 09:22 PM2020-01-04T21:22:52+5:302020-01-04T21:23:09+5:30
युटीटी 65 राष्ट्रीय स्कुल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून...
वडोदरा : मुलींच्या सब ज्युनियर गटातील भारताची दुसऱ्या स्थानी असलेल्या महाराष्ट्रच्या युवाटेबल टेनिस खेळाडू पृथा वर्तीकरच्या नजरा युटीटी 65 राष्ट्रीय स्कुल गेम्स टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्यावर असणार आहे. स्कुल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसजीएफआय) मान्यतेखाली होणारी ही स्पर्धा वडोदराच्या समा इनडोअर स्पोर्ट्स स्टेडियम येथे होणार आहे.
13 वर्षीय पुण्याची पृथा मुलींच्या 14 वर्षाखालील एकेरी गटात आणि महाराष्ट्र संघात सहभाग नोंदवणार आहे. याच स्पर्धेत गेल्या वर्षी 14 वर्षाखालील मुलींच्या एकेरी गटात तिने रौप्यपदक मिळवले आहे. वैयक्तिक गटात यावर्षी माझा प्रयत्न सुवर्णपदक मिळवण्याचा असणार आहे. या स्पर्धेमुळे मला चांगली प्रसिद्धी मिळाली. असे पृथा म्हणाली. महाराष्ट्र संघाने गेल्या सत्रात सुवर्णपदक मिळवले होते.
टेबल टेनिस असोसिएशन ऑफ बडोदा आणि अल्टीमेट टेबल टेनिस (युटीटी) आयोजित पाच दिवसांच्या या स्पर्धेत एकूण 968 खेळाडू 38 विविध विभागातून 12 गटात सहभाग नोंदवतील. सांघिक चॅम्पियनशिपसोबत 14, 17 आणि 19 वर्षाखालील गटात मुले व मुली यांचे सामने होतील.
या स्पर्धेत सध्याचा नॅशनल चॅम्पियन पायस जैन व आदर्श छेत्री सोबत गुजरातचे चित्राक्ष भट आणि हर्षिल कोठारी सहभाग नोंदवतील. पश्चिम बंगालमधून मुनमुन कुंडू व आकाश पाल सहभागी होतील.सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत आठ गटात संघांची विभागणी असणार आहे. प्रत्येक गटातील विजेता संघ हे बाद फेरीत जातील.