आॅस्ट्रेलियाकडून पाकचा धुव्वा
By admin | Published: January 8, 2017 03:48 AM2017-01-08T03:48:15+5:302017-01-08T03:48:15+5:30
तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत पाकिस्तानचा २२० धावांनी पराभव करीत आॅस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्वीप’ केले.
सिडनी : तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत पाकिस्तानचा २२० धावांनी पराभव करीत आॅस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने ‘क्लीन स्वीप’ केले.
४६५ धावांचा पाठलाग करणारा पाक संघ पाचव्या आणि अखेरच्या दिवशी चहापानापूर्वी २४४ धावांत गारद झाला. आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड आणि फिरकीपटू स्टीव्ह ओकिफे यांनी प्रत्यकी तीन गडी बाद केले. मालिकेत सर्वाधिक धावा ठोकणारा अजहर अली आणि अनुभवी युनिस खान हे उपाहाराआधीच बाद होताच पाकच्या सामना अनिर्णीत राखण्याच्या आशा मावळल्या. यष्टिरक्षक- फलंदाज सरफराज अहमद याने सर्वाधिक नाबाद ७२ धावांचे योगदान दिले.
पाकने सकाळच्या १ बाद ५५ वरून पुढे खेळ सुरू केला. पहिल्या सत्रात त्यांनी चार गडी गमावले. अझहर अली ११ याने कालच्या धावांत कुठलीही भर न घालता स्वत:चा बळी दिला. सहा चेंडू खेळून तो तंबूत परतला. हेजलवूडने स्वत:च्या गोलंदाजीत त्याला बाद केले. अझहरने या मालिकेत ४०६ धावा केल्या. पाकच्या कुण्या खेळाडूने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत केलेली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. बाबर आझम(९) पायचित झाला. सहा डावांत त्याच्या नावावर केवळ ६६ धावा आहेत.
युनिस खान हा देखील दहा हजार धावांचा पल्ला गाठण्यात अपयशी ठरला. पहिल्या डावात नाबाद १७५ धावा ठोकणारा युनिस झेलबाद झाला. नाईटवॉचमन यासिर शाह(१३) हा ओकिफेचा बळी ठरला. कर्णधार मिस्बाहने ९८ चेंडू खेळून एकाकी संघर्ष केला. या मालिकेत सर्वोच्च ३८ धावांचे योगदान देत तो झेलबाद झाला. वहाब रियाझ (१२), मोहम्मद आमीर(५), इम्रान खान(००)हे तळाचे फलंदाज बाद होताच पाकचा सफाया झाला. आॅस्ट्रेलिया संघ पुढील महिन्यात चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. पाकला एप्रिलपर्यंत क्रिकेट खेळायचे नाही. त्यानंतर चार सामन्यांच्या मालिकेसाठी पाक संघ विंडीजचा दौरा करेल. (वृत्तसंस्था)
12वा
पराभव
आॅस्ट्रेलियाने गाबातील पहिली कसोटी ३९ धावांनी आणि मेलबोर्नची दुसरी कसोटी १ डाव १८ धावांनी जिंकली होती. पाकचा आॅस्ट्रेलियात हा सलग १२ वा पराभव होता. १२ वर्षांआधी सिडनीत पाकने कसोटी सामना जिंकला होता. डेव्हिड वॉर्नर सामन्याचा मानकरी ठरला. पहिल्याच दिवशी उपाहाराआधी त्याने शतक ठोकले होते. दुसऱ्या डावात त्याने अवघ्या २३ चेंडूत अर्धशतक झळकविले. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला मॅन आॅफ द सिरिजने गौरविण्यात आले.
खरी परीक्षा भारतातच!
पाकिस्तानवर ३-० ने एकतर्फी मालिका विजय मिळविला असला तरी आमची खरी परीक्षा भारत दौऱ्यावर होईल, अशी कबुली आॅस्ट्रेलयाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने शनिवारी दिली. हा संघ पुढील महिन्यात चार कसोटी सामने खेळण्यासाठी भारतात येणार आहे.
आॅस्ट्रेलियाने भारतात २००४ पासून मालिका खेळलेली नाही. या दरम्यान त्यांना सात सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले. आॅस्ट्रेलयाने २०१३मध्ये भारताचा दौरा केला त्यावेळी चारही वनडेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
पाकवर विजय मिळविल्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्मिथ म्हणाला, ‘भारताविरुद्धची मालिका कडवी आणि आव्हानात्मक असेल. आम्ही दौऱ्याबद्दल कुठलीही दर्पोक्ती करणार नाही. भारताकडून कडवे आव्हान मिळणार असल्याने भारताला पराभवाची चव चाखायची झाल्यास सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल. भारत दौरा आमच्यासाखी खरे आव्हान असल्याने भारतीय खेळाडूंकडून बरेच काही शिकायला मिळेल. ’
भारताने कसोटीत अलिकडे फार चमकदार कामगिरी केली. विराटच्या नेतृत्वाखालील संघाने सप्टेंबर २०१५पासून सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या. २०१६ मध्ये १२ पैकी नऊ सामने जिंकण्याचा भारताने विक्रम केला. मायदेशात न्यूझीलंडचा ३-० ने आणि इंग्लंडचा पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने केलेला पराभव प्रमुख आहे.
आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला भारत सध्या फॉर्ममध्ये असल्याची स्मिथला चांगली जाणिव आहे. आॅस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर असल्याने भारताला ३-० ने नमविल्यास अव्वल स्थानावर विराजमान होण्याची त्यांना देखील संधी राहील. सध्याच्या संघातील अनेक खेळाडू भारत दौऱ्यावर जातील असे संकेत देत स्मिथ पुढे म्हणाला,‘काही खेळाडूंना भारतत खेळण्याचा अनुभव असल्याने आम्ही सर्वोत्कृष्ट खेळाद्वारे मालिका जिनकण्याचा प्रयत्न करू.’
आॅस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज होणार आहे, पण त्यासाठी परिस्थितीशी लवकर एकरुप व्हावे लागेल. आमच्या संघात अनेक नवे चेहरे आहेत. त्यांना भारतात खेळण्याचा अनुभव नाही. तेथील परिस्थिती पूर्णपणे वेगळीच असेल. भारतीय खेळपट्टया आॅस्ट्रेलियातील खेळपट्ट्यांच्या तुलनेत वेगळ्याच आहेत. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे हाच यशाचा मूलमंत्र असेल. -स्मिथ