आॅस्ट्रेलियाकडून पाकचा धुव्वा

By admin | Published: January 14, 2017 01:19 AM2017-01-14T01:19:08+5:302017-01-14T01:19:08+5:30

यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडचे करिअरमधील पहिले शतक तसेच जेम्स फॉल्कनरने भेदक मारा करीत घेतलेल्या चार बळींमुळे

Pak flame from Australia | आॅस्ट्रेलियाकडून पाकचा धुव्वा

आॅस्ट्रेलियाकडून पाकचा धुव्वा

Next

ब्रिस्बेन : यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडचे करिअरमधील पहिले शतक तसेच जेम्स फॉल्कनरने भेदक मारा करीत घेतलेल्या चार बळींमुळे आॅस्ट्रेलियाने पहिल्या वन-डेत पाकिस्तानवर शुक्रवारी ९२ धावांनी दमदार विजय नोंदविला.
सलामीवीर वेडने डावातील अखेरच्या चेंडूवर शतक साजरे केले. त्याच्या नाबाद १०० तसेच ग्लेन मॅक्सवेलच्या ६० धावांमुळे सुरुवातीच्या अडथळ्यांतून सावरलेल्या यजमान संघाने ९ बाद २६८ धावा उभारल्या. वेड- मॅक्सवेल यांनी सहाव्या गड्यासाठी ८२ धावांची भागीदारी केली. पाकिस्तान संघ ४२.४ षटकांत १७६ धावांत गारद झाला.
फॉल्कनर सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३२ धावांत चार, पॅट कमिन्सने ३३ धावांत तीन आणि मिशेल स्टार्क याने ३४ धावांत दोन गडी बाद केले. या तिघांपुढे पाकचा एकही गोलंदाज स्थिरावू शकला नाही. पाककडून बाबर आजम(३३), कर्णधार अजहर अली (२४) आणि इमाद वसीम(२९)तसेच मोहम्मद रिझवान (२१) यांनी चांगली सुरुवात केली, पण मोठी खेळी करण्यात सर्वांना अपयश आले. पाकचा आॅस्ट्रेलियात २२ आंतरराष्ट्रीय सामन्यांतील २१वा पराभव ठरला.
आॅस्ट्रेलियाने या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळविली. वेडने १०० चेंडूंत ७ चौकार व दोन षट्कारांसह नाबाद १००, तर मॅक्सवेलने ५६ चेंडंूत चौकारांसह ६० धावा केल्या. मॅक्सवेल ३१ व्या षटकांत बाद झाला तेव्हा आॅस्ट्रेलियाच्या ६ बाद १६० धावा होत्या. (वृत्तसंस्था)
मोहम्मद आमेरने सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर (७)आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ(००) यांना धक्के दिले. आईच्या आजारामुळे सर्फराज अहमद पाकला परत गेला. यष्टिरक्षकाचे त्याचे स्थान घेणाऱ्या रिझवानने चार झेल टिपले. पहिला वन डे खेळणाऱ्या ख्रिस लीन याने आमेरला हॅट्ट्रिकपासून वंचित ठेवले. तो १८ धावा काढून परतल्यानंतर ट्रॅव्हिस हेड(३९)याने आकर्षक कव्हर ड्राईव्ह मारले. पाककडून हसनने तीन तर वसीम आणि आमेर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
भारताविरुद्ध आक्रमक खेळू : लियॉन
भारताविरुद्ध आगामी मालिका आमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारी असेल. चार कसोटी सामन्यांच्या या मालिकेत धावा काढण्यासाठी आक्रमकपणे खेळावे लागेल, असे मत आॅस्ट्रेलियाचा आॅफ स्पिनर नाथन लियॉन याने व्यक्त केले.
सिडनी मॉर्निंग हेरॉल्डमधील स्तंभात लियॉन म्हणाला, ‘अलीकडच्या कसोटी इतिहासावर नजर टाकल्यास असे निदर्शनास येते की भारताने दहा वर्षांत ४९ सामने देशात खेळले व त्यातीलकेवळ चार गमावले. त्यातील दोन द. आफ्रिका तसेच दोन इंग्लंडने जिंकले आहेत. भारत दौऱ्यात शरीराची आणि मनाची खरी कसोटी पणाला लागते. कौशल्य प्रत्येक आघाडीवर पणाला लावावे लागते. भारतात चांगल्या कामगिरीचा अर्थ तुमचा संघ विश्व दर्जाचा आहे, असाही निघू शकतो.
२९ वर्षांचा नाथन पुढे लिहितो, ‘आम्ही भारत दौऱ्यात धावा काढण्यासाठी आणि गडी बाद करण्यासाठी आमच्या चिरपरिचित आक्रमक स्वभावाचा वापर करू. कर्णधार स्टीव्ह स्मिथ हादेखील परिस्थितीशी लवकर एकरूप होण्याची घाई करीत आहे. चार कसोटी सामन्यांची मालिका २३ फेब्रुवारीपासून पुण्यात सुरू होईल. त्यानंतर बेंगळुरु येथे ४ ते ८ मार्च, रांची १६ ते २० मार्च आणि धर्मशाळा येथे २५ ते २९ मार्च या कालावधीत कसोटी सामने खेळविले जाणार आहेत.
भारताने २०१३ मध्ये कसोटी मालिकेत आॅस्ट्रेलियाला ४-० ने नमविले होते. लियॉन म्हणाला, ‘भारत दौऱ्यात खेळपट्टीचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे असते. मी चार वर्षांपूर्वीच्या दौऱ्यात खेळपट्टीशी ताळमेळ साधणे गरजेचे आहे हेच शिकलो. त्यासाठी थोडा संयम पाळावा लागणार आहे.’

Web Title: Pak flame from Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.