पाक फुस्स... भारत दुसऱ्यांदा हॉकीचा डॉन
By admin | Published: October 31, 2016 06:13 AM2016-10-31T06:13:01+5:302016-10-31T06:13:30+5:30
पुरुष हॉकी संघाने भारतीयांचा आनंद द्विगुणित करताना, पारंपरिक पाकिस्तानला लोळवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची दिवाळी भेट दिली.
कुआंटन : देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू असताना भारताच्या पुरुष हॉकी संघाने भारतीयांचा आनंद द्विगुणित करताना, पारंपरिक पाकिस्तानला लोळवून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीची दिवाळी भेट दिली. अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-२ असा पराभव करून, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला.विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या टीम इंडियाने साखळी फेरीतदेखील पाकिस्तानला 3-2 असेच नमवले होते.संभाव्य विजेता म्हणून स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार खेळताना दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली आहे. 2011 साली भारताने या स्पर्धेत बाजी मारली होती. त्या वेळीही भारताने पाकचाच पेनल्टी शूटआउटमध्ये
पराभव केला होता. दुसरीकडे पाकिस्तान स्पर्धेत गतविजेता म्हणून उतरला होता, परंतु भारतीयांनी प्रत्येक क्षेत्रात वरचढ खेळ करताना पाकची हवा काढली. पाकने २०१२ आणि २०१३ साली स्पर्धेवर वर्चस्व राखले होते. २०१२ साली पाकिस्तानने भारतावर मात करून पहिल्यांदा जेतेपद पटकावले होते, तर २०१३ साली यजमान जपानला नमवून पाक संघ दुसऱ्यांदा आशियाई चॅम्पियन बनला होता.
बाप बाप होता है...
क्रिकेटच्या मैदानात वीरेंद्र सेहवागने पाकच्या शोएब अख्तरला याच शब्दात डिवचले होते. आता हॉकी टीमने पाकला लोळवल्यानंतर सेहवागने टिष्ट्वटरवर याच शब्दात पुन्हा एकदा पाकिस्तानवर वार केला.