पाक संघाला ‘ग्रीन सिग्नल’

By admin | Published: March 12, 2016 03:21 AM2016-03-12T03:21:56+5:302016-03-12T03:21:56+5:30

टी-२० क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या समावेशाबाबतची अनिश्चितता शुक्रवारी अखेर संपुष्टात आली. भारताने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपला संघ भारतात पाठविण्यास हिरवी झेंडी दिली

Pak signals 'green signal' | पाक संघाला ‘ग्रीन सिग्नल’

पाक संघाला ‘ग्रीन सिग्नल’

Next

इस्लामाबाद : टी-२० क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघाच्या समावेशाबाबतची अनिश्चितता शुक्रवारी अखेर संपुष्टात आली. भारताने सुरक्षेचे आश्वासन दिल्यानंतर पाकिस्तान सरकारने आपला संघ भारतात पाठविण्यास हिरवी झेंडी दिली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) कार्यकारी अध्यक्ष नजम सेठी यांनी गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर सरकारने पाक संघाला भारतात जाण्यास परवानगी बहाल केल्याची माहिती पत्रकारांना दिली.
त्याआधी चौधरी निसार यांनी सौदी अरब दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नवाज शरीफ यांना सर्व घटनाक्रम समजावून सांगितला होता. पाक संघाला २४ तास कडेकोट सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन भारताच्या गृहमंत्र्यांनी तसेच गृहसचिवांनी दिल्यानंतर पंतप्रधानांनी संघ पाठविण्यास होकार दिला.
पाक संघ शुक्रवारी रात्री दुबईला रवाना होत असून तेथून कोलकाता येथे जाईल, असे सेठी यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी गोड बातमी ही आहे की, पाक संघाला सरकारने भारतात जाण्याची परवानगी बहाल केली. भारत सरकारने संघाला सुरक्षा पुरविण्याचे ठोस आश्वासन पाक उच्चायुक्तांना दिले आहे.
त्याआधी भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बासित
यांनी भारताच्या गृहसचिवांशी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने देखील बैठकीनंतर वक्तव्य करीत टी-२० विश्वचषकात सहभागी होत असलेल्या सर्वच संघांना फुलप्रुफ सुरक्षा पुरविण्याचा पुनरुच्चार केला. (वृत्तसंस्था)
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले की, आयसीसी टी-२० विश्वचषकासंदर्भात पाकच्या उच्चायुक्तांनी गृहसचिवांची भेट घेत सकारात्मक चर्चा केली. यादरम्यान भारताच्या गृहसचिवांनी पाकसह स्पर्धेत सहभागी सर्वच संघांना कडेकोट सुरक्षा पुरविली जाईल अशी हमी दिली आहे.’
पाकच्या भारतातील आगमनास उशीर होत असल्याने शनिवारी बंगालविरुद्ध होणारा त्यांचा सराव सामना रद्द करण्यात आला आहे. पाक संघ दुसऱ्या सराव सामन्यात रविवारी श्रीलंकेविरुद्ध खेळेल. पाक सरकार गेल्या आठवड्यापासून भारत सरकारकडून आपल्या संघाच्या सुरक्षेबाबत लेखी आश्वासनावर अडून होते. याशिवाय आम्ही संघ भारतात पाठविणार नाही, अशी टोकाची भूमिका घेतली होती.
भारत सरकारने पाक खेळाडू, अधिकारी, मीडिया प्रतिनिधी आणि सामना पाहणाऱ्या चाहत्यांना सुरक्षा पुरविण्याचे आश्वासन देताच पाकने संघ पाठविण्याचे निश्चित केले. विश्वचषकातील भारत-पाक सामना १९ मार्चला ईडन गार्डनवर होणार आहे. आधी हा सामना धरमशाला येथे खेळला जाणार होता. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्रसिंग यांनी या सामन्यास सुरक्षा पुरविण्यास नकार दिला. माजी सैनिकांचा पाक संघावर रोष असल्याचे त्यांचे मत होते. यानंतर पाकने सामनास्थळ बदलण्याची मागणी केली. आयसीसीने ती मान्य करीत सामन्याचे स्थळ कोलकाता येथे हलविले होते. दरम्यान, पाकने टी-२० विश्वचषकासाठी भारत दौरा न केल्यास १ कोटी ५० लाख डॉलरचे नुकसान होणार असल्याची माहिती पीसीबीचे प्रमुख शहरयार खान यांनी पत्रकारांशी बोलताना दिली होती.
> पाकचा सराव सामना रद्द
कोलकाता : पाकिस्तानचा शुक्रवारी बंगाल रणजी संघाविरुद्ध खेळला जाणारा विश्व टी-२० सराव सामना रद्द करण्यात आला. पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार पाकिस्तान शुक्रवारी बंगाल रणजी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार होता, पण बंगाल क्रिकेट संघटनेच्या सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार हा सामना आता रद्द करण्यात आला आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान संघ शनिवारी दुबईमार्गे सायंकाळपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान संघ नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहचत असल्यामुळे १९ मार्च रोजी भारत-पाक संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट लढतीच्या तिकीट विक्रीला विलंब होत आहे. धरमशालाहून कोलकाता येथे स्थानांतरित करण्यात आलेल्या या लढतीच्या तिकीट विक्रीला आता १६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे.’पाकिस्तानला दुसऱ्या सराव सामन्यात १४ मार्च रोजी ईडन गार्डन्समध्ये श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानंतर पाकिस्तान संघ १६ मार्च रोजी क्वालीफायरसोबत तर १९ मार्च रोजी भारताविरुद्ध सामने खेळणार आहे.
गतचॅम्पियन श्रीलंका आणि आॅस्ट्रेलिया हे संघ पूर्वघोषित कार्यक्रमानुसार भारतात डेरेदाखल झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेत टी-२० मालिका जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलिया संघ शुक्रवारी सकाळी दुबईमार्गे येथे दाखल झाला.
>कोण काय म्हणाले.....
पाक संघाला पूर्ण सुरक्षा देऊ. विश्वचषकाच्या आयोजनात कुठलाही अडथळा येणार नाही. सर्व संघांनी निश्चिंत होऊन भारतात प्रवास करावा.
- राजनाथसिंग, गृहमंत्री भारत.कोलकाता येथे येणाऱ्या सर्वच संघांना आम्ही उच्च दर्जाची सुक्षा व्यवस्था प्रदान करू. पीसीबीला आम्ही तसा संदेश दिला आहे.
- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, प. बंगाल.पाकला टी-२० विश्वचषकात खेळताना चाहते पाहू इच्छितात. आमच्या सरकारची चिंता देखील योग्य आहे; पण आता ती संपली.
- शहरयार खान, पीसीबी अध्यक्ष.

Web Title: Pak signals 'green signal'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.