पाकचा धुव्वा

By admin | Published: June 19, 2017 01:06 AM2017-06-19T01:06:34+5:302017-06-19T01:06:34+5:30

भारत-पाक क्रिकेट लढतीबाबत अधिक चर्चा होत असताना फॉरवर्ड खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत

Pak washing | पाकचा धुव्वा

पाकचा धुव्वा

Next

लंडन : भारत-पाक क्रिकेट लढतीबाबत अधिक चर्चा होत असताना फॉरवर्ड खेळाडूंच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारताने रविवारी एफआयएच विश्व हॉकी लीग सेमीफायनलमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा विक्रमी ७-१ गोलने धुव्वा उडविला आणि ‘ब’ गटात अव्वल स्थान कायम राखले.
लंडनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीव्यतिरिक्त हॉकीमध्येही या दोन आशियाई दिग्गज संघांदरम्यानच्या लढतीवर सर्वांची नजर होती. त्यात भारताने अनुभवहीन पाकिस्तान संघाविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. या पराभवामुळे पाकिस्तानचे विश्वकप स्पर्धेत स्थान मिळवण्याचे स्वप्न जवळजवळ भंगले. कारण या स्पर्धेतील हा त्यांचा सलग तिसरा पराभव ठरला.
पहिल्या क्वार्टरमध्ये खेळ बरोबरीत होता. उभय संघांचे चेंडूवरील नियंत्रण समसमान होते. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करताना दोन गोल नोंदवले.
ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंगने १३ व्या मिनिटाला संघाचे खाते उघडले. त्याने तिसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवला. हरमनप्रीतला अचूक फ्लिक लगावता आला नाही, पण पाकिस्तानचा गोलकीपर अमजद अली याला गुंगारा देण्यासा पुरेसा ठरला.
दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीला पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण बिलालला त्यावर गोल नोंदविता आला नाही. भारताने जोरदार प्रत्युत्तर देताना पुढच्याच मिनिटाला गोल नोंदवला. तलविंदरने चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखवित भारताची आघाडी वाढविली. दरम्यान, मनदीप सिंगला ग्रीनकार्ड दाखविण्यात आल्यामुळे काही वेळ भारताला १० खेळाडूंसह खेळावे लागले. भारतातर्फे तिसरा गोल तलविंदरने नोंदवला, पण हा गोल म्हणजे अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगच्या प्रयत्नांचा परिपाक होता. अखेरच्या क्षणी तलविंदरने चेंडूला गोलजाळ्यात ढकलले. सरदारसिंगने डीमध्ये मिळालेल्या संधीवर स्वत:च फटका मारण्याचा विचार केला, पण त्यानंतर त्याने तलविंदरला पास दिला. ब्रेकदरम्यान भारतीय संघ ३-० ने आघाडीवर होता.
ब्रेकनंतरही भारताने आक्रमक पवित्रा कायम राखला. मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीतने सामन्यातील दुसरा गोल नोंदवित भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. प्रत्युत्तरात पाक संघाने पेनल्टी कॉर्नर मिळवला, पण विकास दहियाने उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारतातर्फे पाचवा गोल आकाशदीपने ४७ व्या मिनिटाला नोंदवला. त्यानंतर दोन मिनिटांनी प्रदीप मोरने आघाडी
६-० अशी केली.
सामना संपण्यास ३ मिनिटे शिल्लक असताना पाकिस्तानतर्फे उमर भुट्टाने एकमेव गोल नोंदवला. पाकिस्तानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर बिलालचा फटका भारताने अडवला, पण रिबाऊंडवर भुट्टाने गोल नोंदवला. आकाशदीपने अखेरच्या मिनिटाला गोल नोंदविता भारताला
७-१ ने विजय मिळवून दिला. (वृत्तसंस्था)

1भारतातर्फे हरमनप्रीत सिंग (१३ व ३३ वा मिनिट), तलविंदर सिंग (२१ व २४ वा मिनिट), आकाशदीप सिंग (४७ व ५९ वा मिनिट) आणि प्रदीप मोर (४९ वा मिनिट) यांनी गोल नोंदवले, तर पाकिस्तानतर्फे एकमेव गोल उमर भुट्टा (५७ वा मिनिट) याने केला. पाकचा या स्पर्धेतील हा पहिला गोल ठरला. या विजयासह भारताने उपांत्यपूर्व फेरीत यजमान इंग्लंड आणि आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्धची लढतीची शक्यता टाळली.
2आता भारताला मंगळवारी अखेरच्या साखळी सामन्यात नेदरलँडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. त्यानतंर ‘ब’ गटातील अव्वल संघ निश्चित होईल. पाकिस्तानला बाद फेरीत प्रवेश मिळवण्याच्या आशा कायम राखण्यासाठी स्कॉटलंडविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय मिळवावा लागेल.

Web Title: Pak washing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.