भारताकडून पाकचा धुव्वा

By admin | Published: April 13, 2016 02:26 AM2016-04-13T02:26:15+5:302016-04-13T02:26:15+5:30

कडवा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भारतीय हॉकी संघाने मंगळवारी सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत ५-१ ने पराभूत करीत अंतिम फेरीच्या आशा कायम ठेवल्या

Pak washing India | भारताकडून पाकचा धुव्वा

भारताकडून पाकचा धुव्वा

Next

इपोह : कडवा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानला भारतीय हॉकी संघाने मंगळवारी सुलतान अझलान शाह हॉकी स्पर्धेत ५-१ ने पराभूत करीत अंतिम फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. भारताचा चार सामन्यांतील हा तिसरा विजय असल्याने संघ दुसऱ्या स्थानावर आला.
आजच्या सामन्यात भारताकडून मनप्रितसिंग याने तिसऱ्या, एसव्ही सुनीलने १० तसेच ४१ व्या, तलविंदरने ४९ व्या, रूपिंदरपाल सिंग याने ५४ व्या मिनिटाला गोल केले. पाकचा
एकमेव गोल कर्णधार मोहम्मद
इरफान याने सातव्या मिनिटाला केला. पाक संंघ चार सामन्यांत तीन सामने गमवत सात संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सहाव्या स्थानावर घसरला.
दरम्यान, विश्व आणि गत चॅम्पियन आॅस्ट्रेलियाने अटीतटीच्या लढतीत न्यूझीलंडला १-० ने नमवित सलग चौथा विजय साजरा केला. १२ गुणांसह हा संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरला आहे. न्यूझीलंडने पाच सामन्यांतून आठ गुणांची कमाई केल्याने तिसऱ्या स्थानावर आहे. भारताची पुढील लढत आज बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध होईल.
फायनलची दावेदारी भक्कम करण्यासाठी भारताला पाकवर विजय आवश्यक होता. जपानविरुद्ध पहिला सामना २-१ ने जिंकल्यानंतर आॅस्ट्रेलियाकडून भारतीय संघ १-५ ने पराभूत झाला. त्यानंतर कॅनडाला ३-१ ने आणि आज पाकला ५-१ ने नमविले. भारताने आज पाचही मैदानी गोल केले. पाकला पदकांच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी आज विजय हवा होता; पण भारतीय खेळाडूंनी त्यांच्या खेळाडूंची डाळ शिजू दिली नाही.
हायप्रोफाइल सामन्यात पाच वेळेचा चॅम्पियन आणि गतवर्षी कांस्यपदक जिंकणाऱ्या भारताची सुरुवात धडक झाली. मनप्रितने तिसऱ्याच मिनिटाला रिव्हर्स हिटवर प्रतिस्पर्धी गोलकिपर इम्रान बट्टला चकवत भारताचे खाते उघडले. चार मिनिटांनंतर मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर पाकचा कर्णधार इरफानने गोल करीत बरोबरी साधून दिली. वेगवान खेळाची झलक असलेल्या या सामन्यात सुनीलने मनप्रितच्या पासवर दहाव्या मिनिटाला दुसरा गोल
केला. पाकच्या आक्रमक फळीनेदेखील वारंवार हल्ले केले; पण भारतीय बचाव फळीने सर्व हल्ले निष्प्रभ ठरविले.
सुनीलने स्वत:चा दुसरा तसेच संघाचा तिसरा गोल ४१ व्या मिनिटाला केला. तलविंदरने ४९ व्या मिनिटाला रिव्हर्स फ्लिकवर चौथा गोल केला. सामन्यात ५४ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर ड्रॅग फ्लिकर रुपिंदरने गोल नोंदवत पाकचा प्रतिकार मोडून काढला.
सामना संपायला चार मिनिटे असताना भारताला आणखी एक गोल नोंदविण्याची संधी होती; पण रूपिंदरचा पेनल्टी स्ट्रोकचा वेध हुकला. इम्रान बट्टने स्ट्रोक रोखून भारतीय संघाला सहाव्या गोलपासून वंचित ठेवले. सामना संपताच उभय संघातील खेळाडूंनी हस्तांदोलन करीत भारतीय संघाचे विजयाबद्दल अभिनंदन केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Pak washing India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.