भारताचा विजयरथ रोखण्यात पाक यशस्वी ठरेल?
By admin | Published: March 13, 2016 04:18 AM2016-03-13T04:18:47+5:302016-03-13T04:18:47+5:30
पाकिस्तान संघ विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून, परंपरागत प्रतिस्पर्धी संघ विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरेल का
नवी दिल्ली : पाकिस्तान संघ विश्वकप टी-२० स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले असून, परंपरागत प्रतिस्पर्धी संघ विश्वकप स्पर्धेत टीम इंडियाविरुद्ध पराभवाची मालिका खंडित करण्यात यशस्वी ठरेल का, याबाबत उत्सुक आहे.
पाकिस्तान संघाला यंदाच्या टी-२० विश्वकप स्पर्धेत भारताविरुद्ध १९ जून रोजी धरमशालामध्ये साखळी लढतीत खेळायचे होते, पण पाकिस्तानने सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे ही लढत कोलकाता येथील ईडन गार्डनवर स्थानांतरित करण्यात आली. पाक संघाची ईडन गार्डनवरील कामगिरी टीम इंडियाची चिंता वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. भारताने २०१२च्या टी-२० विश्वकप स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तानचा पराभव केला होता. ईडन गार्डनमध्ये पहिला वन-डे सामना १८ जानेवारी १९८७ रोजी खेळला गेला. त्यात पाकिस्तानने दोन गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर २८ आॅक्टोबर १९८९ रोजी पाकिस्तानने भारताचा ७७ धावांनी तर १३ नोव्हेंबर २००४ रोजी ६ गडी राखून विजय मिळवला होता. ३ जानेवारी २०१३ रोजी पाकिस्तानने भारताविरुद्ध ८५ धावांनी विजय मिळवला होता. ईडन गार्डनवर आतापर्यंत केवळ दोन टी-२० सामने खेळले गेले असून, त्यात एका लढतीत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे, तर एक सामना रद्द झाला होता.
आफ्रिदीची रविवारी
पत्रकार परिषद
कोलकाता : आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतात येत असलेल्या पाकिस्तान संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदी रविवारी कोलकातामध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्पष्ट केले की, कोलकातामध्ये ताज बंगाल हॉटेलमध्ये आफ्रिदी रविवारी सकाळी पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहे. आफ्रिदीनंतर पाकिस्तान संघातील चार खेळाडू ओपन मीडिया सत्रासाठी उपलब्ध राहतील.