2019 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरण्यात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज अपयशी
By admin | Published: April 12, 2017 10:58 PM2017-04-12T22:58:43+5:302017-04-12T22:58:43+5:30
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 12 - पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ 2019 साली होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरण्यात अपयशी ठरले आहेत. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर राहिल्याने दोन्ही संघांना विश्वचषकासाठी थेट पात्र होता आले नाही. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, श्रीलंका, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ विश्वचषक स्पर्धेला थेट पात्र ठरले आहेत. आता पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजला विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी पात्रता स्पर्धेच्या दिव्यातून जावे लागणार आहे.
वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका नुकतीच आटोपली. या मालिकेत पाकिस्तानने वेस्ट इंडिजवर 2-1 ने मात केली. मात्र या विजयामुळे पाकिस्तानच्या क्रमवारीत मोठा बदल झाला नाही. जर पाकिस्तानने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली असती तर पाकिस्तानला विश्वचषकासाठी पात्र ठरता आले असते.
विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र संघांची क्रमवारी ठरवण्यासाठी संघांची 1 मे 2014 ते 1 मे 2017 या काळातील कामगिरी विचारात घेण्यात आली आहे. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचे संघ आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक पात्रता स्पर्धेत खेळतील. या स्पर्धेमध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजसह अन्य 10 संघ सहभागी होतील.