पाकिस्तानची श्रीलंकेवर मात
By Admin | Published: February 4, 2016 03:43 AM2016-02-04T03:43:06+5:302016-02-04T03:43:06+5:30
हसन मोहसीनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने अंडर १९ वर्ल्डकपच्या ‘ब’ गटातील अंतिम साखळी लढतीत आज येथे श्रीलंकेचा २३ धावांनी पराभव करताना सलग तिसरा विजय नोंदविला
मिरपूर : हसन मोहसीनच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पाकिस्तानने अंडर १९ वर्ल्डकपच्या ‘ब’ गटातील अंतिम साखळी लढतीत आज येथे श्रीलंकेचा २३ धावांनी पराभव करताना सलग तिसरा विजय नोंदविला. या विजयाने पाकिस्तान ‘ब’ गटात अव्वल स्थानी, तर श्रीलंका दुसऱ्या क्रमांकावर राहिला. या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ४८.४ षटकांत सर्व बाद २१२ धावा केल्या. त्यांच्याकडून हसन मोहसीनने ८६, सलमान फय्याजने ३३, मोहंमद उमरने २६ व सैफ बदरने २४ धावांचे योगदान दिले.
श्रीलंकेकडून वानिदू हसारंगा (३० धावांत २ बळी), थिलन निमेष (३८ धावांत २) आणि दमिता सिल्वा (४१ धावांत २) यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ कामिंदू मेंडिस (६८) आणि विषाद रंदिका (४६) यांच्या चांगल्या फलंदाजीनंतरही ४६.४ षटकांत १८९ धावांत गारद झाला.
पाकिस्तानकडून शादाब खानने ३१ धावांत ३ गडी बाद केले. समीर गुल, मोहसीन आणि अहमद शफीक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. श्रीलंकेचा संघ आता ७ रोजी ‘क’ गटातील अव्वल स्थानी असणाऱ्या इंग्लंड संघाशी, तर दुसऱ्या दिवशी पाकिस्तान वेस्ट इंडीज संघाशी दोन हात करेल.(वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :
पाकिस्तान : ४८.४ षटकांत सर्व बाद २१२. (हसन मोहसीन ८६, सलमान फय्याज ३३, मोहंमद उमर २६, सैफ बदर २४. वानिदू हसारंगा २/३०, थिलन निमेष २/३८, दमिता सिल्वा २/४१).
श्रीलंका : ४६.४ षटकांत सर्व बाद १८९. (कामिंदू मेंडिस ६८, विषाद रंदिका ४६, शादाब खान ३/३१, समीन गुल २/२९, मोहसीन २/२८, अहमद शफीक २/२३).