पाकिस्तान "चॅम्पियन्स", भारताचा "विराट" पराभव; फलंदाजांच्या नांग्या
By admin | Published: June 18, 2017 09:43 PM2017-06-18T21:43:37+5:302017-06-18T22:00:24+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 18 - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या महामुकाबल्यामध्ये भारतीय संघाला 180 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. 339 धावांचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी सपशेल निराशा केली. अवघ्या 158 धावांमध्ये भारताच्या फलंदाजांनी नांग्या टाकल्या. या सामन्यात भारताच्या फलंदाजांसोबत विराटच्या कॅप्टनशीपबद्दलही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
पाकिस्तानच्या फलंदाजांकडून सपाटून मार खात असतानाही आर.अश्विनला सातत्याने गोलंदाजी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. बांगलादेशविरूद्धच्या विजयात मोक्याच्या क्षणी दोन विकेट घेऊन सामन्याला कलाटणी देणा-या केदार जाधवला जवळपास 40 व्या षटकात विराटने गोलंदाजी दिली. डेथ ओव्हर्समध्ये पार्ट टाइम बॉलरला गोलंदाजी देणं योग्य नव्हतं अशी टीकाही विराटवर सोशल मीडियावर होत आहे.
339 धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरूवात अत्यंत खराब झाली. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने आपल्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारतीय फलंदाजीचं अक्षरशः कंबरडं मोडलं. त्याने पहिल्याच षटकात भारताचा सलामीवीर रोहित शर्माला भोपळाही न फोडता बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेल्या भारताचा कर्णधार विराट कोहलीनेही आज निराश केलं. वैयक्तिक दुस-या षटकात मोहम्मद आमिरने त्याला केवळ 5 धावांवर शादाब खानकरवी झेलबाद केलं. तर त्यानंतर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या शिखर धवनलाही त्याने 21 धावांवर यष्टीरक्षक कर्णधार सरफराज अहमदकडे झेल देण्यास भाग पाडलं. भरवशाच्या युवराज आणि धोनीनेही आज सपशेल निराशा केली. अनुक्रमे 22 आणि 4 धावा काढून दोघं बाद झाले. त्यानंतर मिडल ऑर्डरमधला केदार जाधवही 9 धावांवर तंबूत परतला. हार्दिक पांड्याने 76 धावांची जिगरबाज खेळी केली मात्र, त्याला साथ मिळाली नाही. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजा यांच्यातील ताळमेळ चुकला आणि पांड्या धावबाद झाला. तळाचे फलंदाज जाडेजा(15), अश्विन(1), बुमरा (1), भुवनेश्वर (1*) फारशी चमक दाखवू शकले नाहीत.
त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसऱ्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं.