‘फिक्सिंग करून पाकिस्तान फायनलमध्ये’
By admin | Published: June 17, 2017 02:54 AM2017-06-17T02:54:11+5:302017-06-17T02:54:11+5:30
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज आमिर सोहेलने मॅच फिक्सिंग करत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला असल्याचा आरोप केला आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज आमिर सोहेलने मॅच फिक्सिंग करत पाकिस्तान संघ फायनलमध्ये पोहोचला असल्याचा आरोप केला आहे. आमिर सोहेलच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ माजली. या वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर आमिर सोहेलने सारवासारव करत आपण त्या उद्देशाने बोललो नसल्याचे म्हटले आहे. आपल्या वक्तव्याचा संदर्भ वेगळा असल्याचे म्हणत घुमजाव केले आहे.
आमिर सोहेलने पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलताना हे वक्तव्य केले. अप्रत्यक्षपणे पाकिस्तानच्या विजयामागे मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप त्याने केला आहे.
"पाकिस्तानी संघ आणि कर्णधार सर्फराज अहमदला अशाप्रकारे जास्त आनंद साजरा करण्याची गरज नाही. हा संघ आपल्या खेळाच्या जोरावर नाही तर बाहेरील कारणांमुळे चॅम्पियन ट्रॉफीच्या फायलनमध्ये पोहोचला आहे", असं वक्तव्य सोहेलने केलं आहे. तुम्ही कोणतं महान काम केलेलं नाही हे सर्फराजला सांगण्याची गरज नाही. कोणीतरी दुसऱ्याने सामने जिंकण्यात तुमची मदत केली आहे. यामुळे जास्त आनंदी होण्याचं तुमच्याकडे कारण नाही. पडद्याच्या मागे काय चालू आहे सर्वांना माहीत आहे. या खेळाडूंना इथपर्यंत आणण्यात आलं आहे, असेही सोहेल या वेळी म्हणाला होता.
वक्तव्यावर टीका होऊ लागल्यानंतर आमिर सोहेलने पलटी मारत आपल्या या व्हिडिओचा संदर्भ वेगळा होता असा दावा केला आहे. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये होणाऱ्या सेमीफायनलआधीचा हा व्हिडिओ असल्याचे त्याने म्हटले.
(वृत्तसंस्था)