पाकने विश्वकप स्पर्धेवर बहिष्कार टाकू नये
By admin | Published: December 13, 2015 11:18 PM2015-12-13T23:18:41+5:302015-12-13T23:18:41+5:30
भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात
कराची : भारत आणि पाकिस्तान संघांदरम्यान या महिन्यातील प्रस्तावित द्विपक्षीय मालिकेला मंजुरी देण्यासाठी भारतातर्फे उशीर होत असला तरी पीसीबीने पुढील वर्षी मार्च-एप्रिल महिन्यात भारतात होणाऱ्या विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार करू नये, असा सल्ला पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने बोर्डाला दिला आहे.
अक्रम म्हणाला, ‘‘भारत पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय मालिकेबाबत निर्णय घेण्यासाठी अधिक वेळ घेत आहे. पण ही मालिका आता झाली नाही तरी भविष्यात लवकरच होईल, अशी आशा आहे. भारतीय बोर्डाने खेळण्यास इच्छुक आहे किंवा नाही, याबाबत स्पष्ट उत्तर द्यायला हवे. त्यामुळे हा मुद्दा निकाली निघेल.’’
दरम्यान, पाकिस्तानने कुठल्याही परिस्थितीत विश्व टी-२० स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत विचार करू नये, असेही अक्रम म्हणाला.
अक्रमने सांगितले, ‘विश्व टी-२० आयसीसीची स्पर्धा असून यात कुठल्याही परिस्थितीत खेळणे आवश्यक आहे. जर आम्ही असे केले नाही तर प्रदीर्घ कालावधीपर्यंत नुकसान सोसावे लागेल.’
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख शहरयार खान म्हणाले होते, की पीसीबी विश्व टी-२० स्पर्धेसाठी आपला संघ भारतात पाठवण्यापूर्वी सरकारकडून सुरक्षेची हमी मागणार आहे.
अक्रम म्हणाला, ‘भारतात मला तसेच प्रेम मिळाले जसे पाकिस्तानमध्ये सचिन तेंडुलकरला मिळाले.’(वृत्तसंस्था)
विश्व टी-२० स्पर्धेत न खेळल्यामुळे आमच्या खेळाडूंवर आणि आमच्या
क्रिकेटवर परिणाम होईल. भारत आमच्यासोबत खेळण्यास इच्छुक नाही तर कुठली अडचण नाही. आम्ही त्यांच्यासोबत न खेळताही जीवन जगू शकतो. आम्ही खेळलो किंवा नाही खेळलो तरी त्यामुळे दहशतवादाची समस्या संपणार नाही.
- वसीम अक्रम,
माजी कर्णधार, पाकिस्तान