आजपासून पाक-श्रीलंका वनडे सिरीज
By Admin | Published: July 11, 2015 01:38 AM2015-07-11T01:38:58+5:302015-07-11T01:38:58+5:30
कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता पाकिस्तान आजपासून सुरू होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून २०१७मध्ये होणाऱ्या
दाम्बुला : कसोटी मालिका जिंकल्यानंतर आता पाकिस्तान आजपासून सुरू होणाऱ्या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेला पराभूत करून २०१७मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने मैदानात पाऊल ठेवेल.मिसबाह उल हक याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाने कसोटी मालिका २-१नी जिंकली. पाकिस्तानने पाल्लेकल येथील अखेरच्या कसोटी सामन्यात विजयासाठी ३७७ धावांचे लक्ष्य फक्त ३ गडी गमावून पूर्ण केले. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना हा सर्वांत मोठा सहाव्या क्रमांकाचा विजय आहे.
या कसोटीत युनीस खानने नाबाद १७१, सलामीवीर शॉन मसूदने १२५ आणि मिसबाहने नाबाद ५९ धावा केल्या. तथापि, हे तिन्ही फलंदाज वनडे मालिकेत दिसणार नाहीत. मिसबाहने वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तर युनीस आणि मसूद यांची वनडेसाठी निवड झालेली नाही.
आघाडीचा फलंदाज अजहर अली आयसीसी क्रमवारीत नवव्या स्थानी असणाऱ्या पाकिस्तानी संघाचा कर्णधार असेल. पाकिस्तानला इंग्लंडमध्ये होणाऱ्या ८ देशांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी ही मालिका जिंकणे आवश्यक आहे.
अजहर म्हणाला, ‘‘आमच्यासाठी ही महत्त्वपूर्ण मालिका आहे आणि आम्ही जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहोत. अधिकांश खेळाडूंना श्रीलंकेत खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.’’
तथापि, पाकिस्तानची गेल्या काही काळातील वनडेतील कामगिरी तेवढी चांगली नाही. त्यांना वर्ल्डकप उपांत्यपूर्व फेरीत यजमान आॅस्ट्रेलियाने पराभूत केले. त्यानंतर एप्रिलमध्ये बांगलादेशाने त्यांचा ३-० असा सफाया केला. तथापि, दुबळ्या झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी २-० असा विजय मिळविला. पाकिस्तानी संघाचा वेगवान गोलंदाज मोहंमद इरफानचे संघात पुनरागमन झाले आहे. दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. तथापि, वहाब रियाज दुखापतीमुळे बाहेर आहे, तसेच फिरकी गोलंदाज हॅरिस सोहेलच्या गुडघ्याला दुखापत आहे. दुसरीकडे, श्रीलंका माहेला जयवर्धने आणि कुमार संघकारा निवृत्त झाल्यानंतर पहिली वनडे मालिका खेळत आहे. वर्ल्डकपमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या श्रीलंकन संघात मिलिंदा सिरिवर्धना आणि सचित पतिराना या दोन नव्या अष्टपैलू खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे.