पाकची मोठ्या विजयाकडे वाटचाल

By admin | Published: November 3, 2014 02:25 AM2014-11-03T02:25:54+5:302014-11-03T02:32:28+5:30

पाकचा कर्णधार मिसबाह उल-हकने कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकाचा २८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी साधली.

Pakistan will move towards a big victory | पाकची मोठ्या विजयाकडे वाटचाल

पाकची मोठ्या विजयाकडे वाटचाल

Next

अबुधाबी : कर्णधार मिसबाह उल-हकचे विक्रमी शतक व फिरकीपटूंचा अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने आॅस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे.
पाकचा कर्णधार मिसबाह उल-हकने कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतकाचा २८ वर्षांपूर्वीच्या विक्रमाची बरोबरी साधली. मिसबाहने सर्वांत वेगवान अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. मिसबाहच्या विक्रमी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात विजयाची मजबूत पायाभरणी केली.
मिसबाहने (नाबाद १०१ धावा, ५७ चेंडू, ११ चौकार, ५ षट्कार) ५६ चेंडूंमध्ये शतक झळकावीत विव्ह रिचर्डस्च्या विक्रमाची बरोबरी साधली. रिचर्डस्ने अ‍ॅन्टिग्वा येथे १९८६ मध्ये इंग्लंडविरुद्ध हा विक्रम नोंदविला होता. त्याआधी मिसबाहने २१ चेंडूंमध्ये सर्वांत वेगवान अर्धशतकी खेळीचा विक्रम नोंदविला. पाकिस्तानने दुसरा डाव ३ बाद २९३ धावसंख्येवर घोषित करीत आॅस्ट्रेलियापुढे विजयासाठी ६०३ धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियाची आज चौथ्या दिवसअखेर ४ बाद १४३ अशी अवस्था झाली आहे. फिरकीपटू बाबरने सुरुवातीला सलामीवीर ख्रिस रॉजर्सला (२) माघारी परतवले. त्यानंतर त्याने ग्लेन मॅक्सवेलला (४) तंबूचा मार्ग दाखविला. मायकल क्लार्कला (५) मोठी खेळी करता आली नाही. वॉर्नर व स्मिथ यांनी चौथ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. हफीजने वॉर्नरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पहिल्या लढतीत २२१ धावांनी विजय मिळविणाऱ्या पाकिस्तान संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध २० वर्षांनंतर मालिका विजयाची संधी आहे. आॅस्ट्रेलिया संघ अद्याप लक्ष्यापासून ४६० धावा दूर असून त्यांच्या ६ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी स्मिथ (३८) व मार्श (२६) खेळपट्टीवर होते. पाकिस्तानने पहिला डाव ६ बाद ५७० धावसंख्येवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव २६१ धावांत संपुष्टात आला. (वृत्तसंस्था)



 

Web Title: Pakistan will move towards a big victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.