पाकिस्तानचं चॅलेंज: म्हणे, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताची टरकली
By admin | Published: July 6, 2017 08:44 PM2017-07-06T20:44:51+5:302017-07-06T20:44:51+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत-
इस्लामाबाद, दि. 6 - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये टीम इंडियाचा दारूण पराभव केल्यापासून पाकिस्तानच्या संघाला चांगलाच माज आला आहे. भारतीय संघाला पाकिस्तानसोबत हारण्याची भीती वाटते आणि त्यामुळेच भारत द्विपक्षीय मालिका खेळत नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले आहेत. भारतावर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये मिळवलेल्या विजयामुळे पाकिस्तान संघाचा आत्मविश्वास खूप वाढला आहे त्यामुळेच त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आमच्या संघाचा सामना करावा असं आव्हान शहरयार खान यांनी दिलं आहे.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून खेळांडूंसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना शहरयार खान म्हणाले, "चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर मी द्विपक्षीय मालिकेचा प्रस्ताव भारतीय टीमला दिला होता, पण त्यांनी हा प्रस्ताव ठोकरला. कारण ते आपल्यासोबत खेळायला घाबरतात.भारतीय संघाला आमची भीती वाटत असल्यानं ते आमच्याविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार देत आहेत. फक्त आयसीसीच्या सामन्यामध्येच आम्ही खेळणार आहेत, असं भारताकडून सांगितलं जातं. पण इतर स्पर्धांमध्ये आमच्याविरुद्ध खेळण्याची हिंमत भारतीय संघात नाही", असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी म्हटलं आहे.
2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील क्रिकेटचं नातंही खराब झालं. त्यामुळे 2012 ची मालिका वगळता दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या टुर्नामेंटमध्येच एकमेकांविरोधात खेळतात. आयसीसी टुर्नामेंटचा इतिहास पाहता आतापर्यंत भारताचं पारडं नेहमी जड राहिलं आहे पण केवळ एका विजयामुळे पाकिस्तानच्या संघाला माज आला आहे.
बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये झालेल्या एका करारानुसार दोन्ही संघ 2015 ते 2023 या काळात अनेक द्विपक्षीय मालिका खेळायच्या होत्या मात्र जोपर्यंत सीमेपलिकडून दहशतवादाचं समर्थन बंद होत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत द्विपक्षीय मालिका खेळणार नाही असं भारताने आधीच स्पष्ट केलं आहे.